
सिंदूर महारक्तदान यात्रेत सातारा जिल्ह्याचे योगदान देणार : हिंदकेसरी संतोषआबा वेताळ
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
“सातारा जिल्हा शूरांचा आणि विरांचा जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. देशाच्या रक्षणासाठी जिल्ह्यातील जवानांचे मोलाचे योगदान आहे.
अनेकांनी शत्रूला नामोहरम करताना जीवाची बाजी लावली आहे. याच मातीतील सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीत शत्रू बरोबर दोन हात करताना दहशतवादी, अतिरेक्यांशी लढताना सातारा जिल्ह्यातील जवानांचे रक्त सांडले आहे. त्या जवानांच्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती हिंदकेसरी पैलवान, संतोष वेताळ (आबा) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुभेदार मेजर सुभाष दिनकर पानसकर,
हवालदार अनिल जगताप, निलेश पवार, शिवाजीराव माने, हवालदार सचिन जगताप शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यासह निसार मुल्ला, पै. अतुल पवार, सतीश डांगे, सुधीर डांगे , अजय थोरात, अजय भोंगे, कृष्णत मदने, अरविंद यादव, पवन शिंदे, रामभाऊ फुके, रवींद्र माने, प्रताप क्षीरसागर, फिरोज पटेल आदी उपस्थित होते.
पै. संतोष वेताळ म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदूर महारक्तदान यात्रा आयोजित केली आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पाकला धडा शिकवला आहे. भारत भूमीवर झालेल्या हल्ल्यामुळे कुस्ती क्षेत्रातील तमाम पैलवानांचे रक्त पेटून उठले आहे आपला युवक सीमेवर जाऊन शस्त्र हाती घेऊ शकत नाही. मात्र एक देशभक्त म्हणून रक्तदान करून सैनिकांना प्रेरणा देऊ शकतो. सिंदूर महारक्तदान यात्रा ही फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या संपूर्ण वर्षाच्या कालावधीत विशाखापट्टणमधील नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये पुढील दोन महिन्यात गरजेनुसार युवकांच्या वतीने रक्तदान केले जाणार आहे. आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांना वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून रक्ताचा पुरवठा केला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हिंदकेसरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपताना वृक्षारोपण मोहीम राबवून 13 हजार वृक्षांचे जतन करण्यावर भर देण्यात आला आहे.
डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून सिंदुर महारक्तदान यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा सांगली येथून सुरू होणार असली तरी सातारा जिल्हा या मोहिमेत मागे राहणार नाही. यासाठी सातारा जिल्ह्यातील जवान देशाचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीर च्या पवित्र भूमीत जाऊन रक्तदान करणार आहेत.
आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही उभी केलेली रक्तदानाची चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करु या ही मोहीम गतिमान करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील पैलवान पुढे येतील, असा विश्वास हिंदकेसरी वेताळ यांनी व्यक्त केला.