सीए दिलीप गुरव यांचा ‘टॉप-५० प्रभावशाली नेते’ यादीत समावेश कराड अर्बन बँकेच्या CEO चा ‘इंडियन स्टार्टअप टाइम्स’तर्फे राष्ट्रीय स्तरावर सन्मान

सीए दिलीप गुरव यांचा ‘टॉप-५० प्रभावशाली नेते’ यादीत समावेश
कराड अर्बन बँकेच्या CEO चा ‘इंडियन स्टार्टअप टाइम्स’तर्फे राष्ट्रीय स्तरावर सन्मान
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप महादेव गुरव यांची देशातील सहकारी बँकांमधील टॉप-५० प्रभावशाली नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘इंडियन स्टार्टअप टाइम्स’ने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या या विशेष यादीत त्यांचा गौरवपूर्वक समावेश झाला असून, त्यांच्या नेतृत्वगुणांना व बँकेच्या बळकट कार्यसंस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
१०८ वर्षांची परंपरा लाभलेल्या कराड अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय ५८३८ कोटी रुपयांहून अधिक आहे. गेल्या तीन दशकांपासून सीए दिलीप गुरव यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांनी ग्राहककेंद्रित सेवा, आर्थिक साक्षरता, डिजिटल बँकिंगचा विस्तार आणि समाजाभिमुख उपक्रमांवर विशेष भर देऊन बँकेला काळानुरूप विकसित केलं.
‘इंडियन स्टार्टअप टाइम्स’ने आपल्या विशेष लेखात नमूद केले आहे की, गुरव यांचा प्रामाणिक आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन बँकेला विश्वासार्हता आणि सशक्ततेकडे घेऊन गेला आहे. बदलत्या आर्थिक वातावरणातही त्यांनी नवोपक्रमशीलतेच्या माध्यमातून बँकेला यशस्वीपणे मार्गक्रमण करून दिले आहे.
या यशामुळे कराड अर्बन बँकेच्या कार्यपद्धतीला राष्ट्रीय मान्यता लाभली असून, सीए दिलीप गुरव यांच्या नेतृत्वगुणांचेही देशभर कौतुक होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे कराड शहराच्या सहकार क्षेत्राला नवा गौरव प्राप्त झाला आहे.