
‘कराड मर्चंट’च्या ५०१ कोटी ठेवी पुर्ण
सत्यनारायण मिणीयार; संस्थेला ८ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्थेने नुकत्याच संपलेल्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात गत वर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये १० टक्के व कर्जात १६ टक्के ऐवढी प्रशसनीय वाढ केली आहे. तसेच संस्थेचा एकत्रित व्यवसाय ८७१ कोटी झाला असून संस्थेने ५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा पुर्ण केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना चेअरमन श्री. पाटील म्हणाले, यावर्षी संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ करित संस्थेकडे ३६२ कोटींची कर्जे वितरीत केली असून गत वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात चांगली वसुली झाल्याने ढोबळ एनपीए ९.३२ टक्के कमी करण्यात यश मिळविले आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळे संस्थेच्या ठेवी ५०१ कोटींवर पोहचल्या आहेत. तर नफ्यामध्ये २७ टक्याने वाढ होवून एकूण १७ कोटी १७ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. सर्व तरतुदी वजा करता निव्वळ नफा ८ कोटी ७० लाख इतका झाला आहे. संस्थेने विविध बँकेत ३०० कोटींची गुंतवणुक केली असून निव्वळ एनपीएही शुन्य टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे.
संस्थेचे कामकाज विविध २७ शाखांतून सुरु असून १८ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत असल्याचे सांगताना संस्थेचे चेअरमन श्री. पाटील म्हणाले, बँकीग क्षेत्रात वेगवेगळ्या नवनवीन इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून संपुर्ण शाखा सीबीएस प्रणालीचा अवलंब करीत आहे. त्याचाही सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच चालू आर्थिक वर्षात नेहमीप्रमाणे मर्चंट समुहाने आपली सामाजिक बांधिलकीचे भान जपत उपविभागीय कार्यालय, कराड येथे येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी एअरपोर्ट बाकडी व दैनंदिन वापराच्या वस्तू दिल्या असून, मर्चंट समुहाकडून भगवान महावीर गोरक्षण ट्रस्ट मौजे वाघेरी (ता. कराड) यांना गोसंगोपनासाठी १० लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप व संचालक, सभासद, कर्जदारांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत सर्व ग्राहकांचे आणि सर्व सेवकांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचेही चेअरमन श्री. पाटील यांनी आभार मानले.