जीवनशैलीमहाराष्ट्रव्यवसाय

‘सह्याद्रि’साठी चार वाजेपर्यंत सरारारी ६२ टक्के मतदान 99 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चोख पोलीस बंदोबस्त

‘सह्याद्रि’साठी चार वाजेपर्यंत सरारारी ६२ टक्के मतदान
99 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चोख पोलीस बंदोबस्त
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार (दि. ५) रोजी प्रत्यक्ष मतदान झाली. यामध्ये कराड, कोरेगाव, सातारा, कडेगाव, खटाव या पाच तालुक्यांतील एकूण ९९ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के, तर दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते.
सह्याद्रि कारखान्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पॅनेल, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि माजी जिल्हापरिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील व कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेतन यांच्या मार्गदर्शनाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल यांच्यात तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सभासद, शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. गट क्र. १ कराड, गट क्र. २ तळबीड, गट क्र. ३ उंब्रज, गट क्र. ४ कोपर्डे हवेली, गट क्र. ५ मसूर, गट क्र. ६ वाठार किरोली, तर एकूण मतदार 32,205 आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील ४९ गावात ६८ मतदान केंद्रे, कोरेगाव तालुक्यातील ८ गावात १५ मतदान केंद्रे, सातारा तालुक्यातील ५ गावात ६ मतदान केंद्रे, खटाव तालुक्यातील ३ गावात ५ मतदान केंद्रे आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावात ५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदान करण्यास पसंती दिल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदान केंद्रांवर शांतता असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के, तर दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते.
कराड शहरात एकमेव मतदान केंद्र असलेल्या नगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ येथे गट नंबर १ साठी सभासदांनी मतदान करण्यासाठी सकाळी रांग लावली होती. सकाळी आठ वाजता राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच कडेगाव मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते, विधानपरिषद सदस्य आ. मोहनराव कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी अतीत येथे, तर निवासराव थोरात यांनी मसूर येथे आणि धैर्यशील कदम यांनी पुसेसावळी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. जेष्ठ मतदारांसह महिला मतदारांचा मतदानासाठी उत्साह असल्याचे दिसून आले.
दरम्यान, पुसेगाव विभागात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. वेणेगाव नांदगाव व अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रांवर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तर आमदार मनोज घोरपडे, तसेच विरोधी पॅनेलचे निवासराव थोरात, धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांनीही ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दुपारी चार वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचे दिसून आले.

उद्या मतमोजणी
कराड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 5 येथे रविवार (दि. 6) एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दोन फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 50 मतदान केंद्र व दुसर्‍या फेरीत 51 ते उर्वरीत सर्व मतदान केंद्र याप्रमाणे मतमोजणी होणार आहे. सायंकाळी चार पर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. परंतु, हे मतदान मतपत्रिकेवर होत असल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

उमेदवारांचे नशीब पेटीबंद
सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी तिन्ही पॅनेलचे एकूण ६० उमेदवार, तर ९ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदारांनी आपला मातरुपी कौल दिला असून यासर्व उमेदवारांचे नशीब पेटीबंद झाले आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून त्यांच्यासह मतदारांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »