Uncategorized

सह्याद्रि कारखान्याची निवडणूक केवळ राजकीय स्वार्थासाठी : आमदार डॉ. विश्वजीत कदम

सह्याद्रि कारखान्याची निवडणूक केवळ राजकीय स्वार्थासाठी
आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची टीका; हिंगणगाव बुद्रुकमध्ये प्रचार सभा, कडेगाव तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही
कराड : ग्रामदैवत न्यूज नेटवर्क –
विरोधकांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थासाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.
हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथे आयोजित सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलप्रमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, स्व. पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रि साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या कारखान्याची निवडणूक लागणे, ही खरी चूक आहे. या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. कदम म्हणाले, सह्याद्रि’च्या एनओसीमुळे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. त्या माध्यमातून या तालुक्याचा आर्थिक कायापालट झाला आहे. आदर्श कार्यपद्धतीबद्दल सह्याद्रिचा राज्यात लौकिक आहे. विरोधात दोन पॅनल आहेत. त्यामुळे या निवडणुकीत खुर्द आणि बुद्रुक झालय, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पी.डी. पाटील पॅनलच्या पाठीशी संपूर्ण कडेगांव तालुका खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अपघाताने आमदार झालेल्यांनी या कारखान्याची निवडणूक लावली. अशा व्यक्तींना सभासद त्यांच्या भाषेत उत्तर देतील. सध्या ते माझ्यावर टीका करताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेत बोलत आहेत. विरोधकांत ताळमेळ नाही. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी पॅनेल उभा केले आहे. त्यांना स्वाभिमानी व निष्ठावंत सभासद धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.
आमदार अरुण लाड म्हणाले, सहकार क्षेत्र टिकणे काळाची गरज आहे. चांगल्या चालणाऱ्या संस्थेत राजकारण करणे सभासदांसाठी न परवडणारे आहे. तेव्हा सर्व सभासदांनी पी. डी. पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्यांनी निवडणूक देण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वागत सरपंच महेश कदम यांनी केले. यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रा.आशिष घार्गे, नेताजी यादव,सुरेश शिंगटे, विठ्ठल मुळीक सुरेश यादव, संभाजी बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत यादव, जितेंद्र पवार,विलास यादव, महेंद्र करांडे, लक्ष्मण पोळ यांच्यासह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्राध्यापक आशिष घार्गे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »