परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन कराडचा स्वाभिमान जपुया : रामकृष्ण वेताळ

परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन कराडचा स्वाभिमान जपुया : रामकृष्ण वेताळ
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड करांचा स्वाभिमान जपण्यासाठी परिवर्तनाची लाट उसळली आहे.या लाटेवर स्वार होऊया आणि परिवर्तनाचे शिल्पकार होऊया असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले. ते करवडी ता. कराड येथील सभासदांच्या कोपरा सभेमध्ये बोलत होते. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार दिनकर पिसाळ,बापू डुबल,शंकर पिसाळ,अशोक पिसाळ, भिकू माळी,संपतराव पिसाळ,जयसिंग डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रंगात आली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्व.यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे.दिवसागणिक या पॅनलला मिळणारा सभासदांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणारी ही निवडणूक रंगतदार अवस्थेला पोहोचली आहे.
या निवडणुकीच्या प्रचारात आज रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे हवेली, ओगलेवाडी,करवडी,वडोली निळेश्वर या परिसराचा झंजावाती दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी वाघेरी,वडोली निळेश्वर, करवडी हजारमाची या गावातील सभासदांना सभासद परिवर्तन पॅनलचे विचार पटवून दिले.या सभेला सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
पुढे बोलताना ते म्हणाले सह्याद्री कारखान्याच्या प्रशासनाने मागील अनेक वर्षापासून मनमानी कारभार करून सभासद,कामगार आणि शेतकरी यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्यांना स्वतःच्या कारखान्यात दरवाढ देता आली नाही असे नेते कराडचा स्वाभिमान डीवचण्यासाठी धडपडत आहेत. या लोकांची चाल ओळखून यांना बाजूला ठेवूया. सह्याद्रीमध्ये पाच तारखेला परिवर्तन घडणार आहे.या परिवर्तनामध्ये आपण सहभागी होऊया. यावेळी उमेदवार दिनकर पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कोपरासभेला करवडी गावातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी परिवर्तन होणारच आणि कराडकरांचा स्वाभिमान ही जपला जाणारच यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू असेही सर्व सभासदांनी आश्वासन दिले आहे. या कोपरा सभेला परिसरातील अनेक सभासद बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने वार बदलत चालल्याचा भास निर्माण होत आहे.
फोटो नेम:करवडी येथील कोपरा सभेमध्ये रामकृष्ण वेताळ यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.