कराडमध्ये वादळी वारे, गारपीट, विजांचा कडकडाट,पावसाचा जोर नागरिकांची दाणादाण; झाडे उन्मळून पडली,

कराडमध्ये वादळी वारे, गारपीट, विजांचा कडकडाट,पावसाचा जोर
नागरिकांची दाणादाण; झाडे उन्मळून पडली,
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी कराड शहर, परिसरासह तालुक्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसात सुमारे दहा मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे काही ठिकाणी गारांचा खर्च साचला होता. दरम्यान, या पावसाने हवामानात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला.
मंगळवार (दि. १) रोजी सायंकाळी पाच वाजता कराड शहर व परिसरात वादळी पावसाने हजेरी. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा चांगलाच कडकडाट सुरू होता. पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट वाढून प पावसाचा जोर वाढला. यावेळी सुमारे दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली. यावेळी लहान मुले व युवकांनी पावसात भिजून गारा वेचण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. तसेच शहरातील भाजी मंडई परिसरात बसलेल्या भाजी विक्रेत्यांसह व्यापारांचीही तारांबळ घडल्याचे दिसून आले. शिवतीर्थ दत्त चौकातील कलिंगड विक्रेत्यांची कलिंगड रस्त्यावर आलेल्या जोरदार पाण्यात काही अंतरापर्यंत वाहत गेली. त्यांची जमवाजमा करून बाकीचा माल वाचवण्यासाठी पावसात त्यांची कसरत सुरू असल्याचे दिसून आले. साडेसहा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
विद्युत पुरवठा खंडित
वादळी पावसाबरोबर जोरदार सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही काही ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी मोठा अवधी लागला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची पावसात कसरत सुरू होती.
गारपिटीने हॉटेलच्या काचा फुटल्या
पुणे-बंगलुरु महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे फुटल्याने हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे सोपासेट भिजू नुकसान झाले. अन्य साहित्य वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
ठिकठिकाणी साचला गारांचा खच
कराड शहर परिसरात जोरदार पाऊस सुरू असताना सुमारे दहा मिनिटे मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या. त्यामुळे ठिकठिकाणी गारांचा खच साचल्याचे दिसून आले. यावेळी लहान मुले आणि युवकांनी पावसात भिजून गारा वेचण्याचा आनंदही लुटल्याचे दिसून आले. तसेच शाळा सुटण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
सोसाट्याचे वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील पंचायत समिती समोरील झाड कोसळले. तसेच विजय दिवस चौकामध्ये रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्यामुळे कराड-विटा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. ही बाब निदर्शनास येतात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह समाजसेवक आणि नागरिकांनी झाड रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच पार्श्वनाथ बँक परिसर व वाखाण रस्त्यावरही झाड कोसळले. सुपर मार्केट येथेही दुचाकीवर झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले.
शुभेच्छा कमान कोसळली
शहरातील भेदा चौकामध्ये एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कमान उभारण्यात आली होती. या पावसात सोसायट्याचा जोरदार वारा सुटल्याने यामध्ये शुभेच्छा कमान कोसळली.
भाजी मंडई परिसरात दुकान गाळ्यांमध्ये पाणी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमधील दुकान गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. यामुळे काही दुकानांमध्ये असलेल्या मालाचे नुकसान झाले. पावसाचे पाणी उपसण्यासाठी गाळे धारकांनी विद्युत मोटारी सुरू केल्या होत्या.