
श्री कालिकादेवी’चा पाडव्याच्या मुहूर्तावर 151 कोटी ठेवींचा टप्पा पार
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड या संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १५१ कोटी ठेवी पार करण्याचा संकल्प केला होता. संस्थेने त्याची ३१ मार्च पूर्वीच गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मुहुर्तावर संकल्पपूर्ती केली असल्याची माहिती संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या पत्रकात म्हटले आहे की, संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने १५१ कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. या माध्यमातून संस्थेने सहकार क्षेत्रात भरीव अशी प्रगती केली आहे. यासाठी संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांचे मोठे योगदान व सहकार्य लाभले.
संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातून ई-पेमेंट, डी.डी., अॅटपार चेक, मल्टिसिटी चेक्स या सुविधांबरोबर आरटीजीएस (RTGS) / एनइएफटी (NEFT) शासकीय व ट्रेझरी चलने भरणे या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधा सभासदांपर्यंत अखंडितपणे
चालू ठेवण्याचे मोठे योगदान संस्थेचे गेली ३६ वर्षे सेवा करणारे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे यांचे आहे. त्यामुळे श्री वेळापूर यांचे विशेष कौतुक होत आहे.