सह्याद्रीत घराणेशाही चालणार नाही निवासराव थोरात; पालीत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचा प्रचार शुभारंभ

सह्याद्रीत घराणेशाही चालणार नाही
निवासराव थोरात; पालीत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचा प्रचार शुभारंभ
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
सह्याद्री कारखान्यातील कामगार हे रिटायर झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. सह्याद्रीत घराणेशाही चालणार नाही, आता सर्वसामान्य सभासदाला न्याय मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे उमेदवार तथा उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी व्यक्त केला.
पाल (ता. कराड) येथे खंडोबा देवाच्या साक्षीने स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचा शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, शेतकरी संघटना नेते सचिन नलावडे, भीमराव काका पाटील, संपतराव माने, संग्राम पवार, अविनाश नलवडे, पालीचे डॉ. सत्यजित काळभोर पाटील यांच्यासह सभासद, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
श्री. थोरात म्हणाले, तीस वर्षात किती जणांना तुम्ही कारखान्यात परमनंट केले आहे? यांचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत देता आलेलं नाही. एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या की, सह्याद्री कारखान्यातील कामगार हे रिटायर झाले तरी त्यांना परमनंट केलं जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. ५४ वर्षात तुम्हाला कारखान्याचे विस्तारीकरण करता आला नाही. आता विस्तारित करण्याचे काम करत आहात पण त्यातही वादग्रस्त कंपनीला काम देऊन कारखाना अडचणीत आणण्याचे काम तुम्ही केले आहे.
धैर्यशील कदम म्हणाले, आमच्या पॅनेलचे चिन्ह विमान आहे. हे आमचं पॅनेल तुम्ही कस्पटासमान समजत असला तरी हेच पॅनेल तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवार राहणार नाही. बापजाद्यापासून आमचा सहयाद्रीशी संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, ५४ वर्षांपूर्वी सहयाद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री कारखान्याची निर्मिती केली. त्यांनी विश्वासाने हा कारखाना काही लोकांच्या हाती दिला मात्र, त्यांनी हा कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे वागले, अशी टीका वेताळ यांनी नाव न घेता माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर केली.
सह्याद्रीची लढाई जिंकायचीच
माझा उमेदवारी अर्ज बाद करून आमचं पॅनल लंगड करण्याचं काम या विद्यमान चेअरमन यांनी केलं, पण मी थांबलो नाही मला अनेक सभासदांचे फोन आले आणि त्यांनी सांगितले, “आता थांबायचं नाही आता लढायचं हाय…तुम्ही परत कोर्टात याचिका दाखल करा आणि आम्ही सर्व शेतकरी सभासद तुमच्या सोबत आहोत,” असा विश्वास मला सभासदांनी दिला. त्यामुळे मी हे पॅनेलं पूर्ण ताकतीनिशी लढत आहोत. तसेच विरोधक इतके घाबरले की त्यांनी माझाच अर्ज बाद करून थांबले नाही तर इतर प्रवर्गातील सभासदांचा देखील अर्ज त्यांनी बाद केला आहे. त्यामुळे आता लढाईत थांबायच नाही तर आता लढाई लढाईची आणि जिंकायची देखील, असा विश्वास निवासराव थोरात यांनी व्यक्त केला.