वाठार येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना अटक आटके येथील दोन जणांचा तर सांगलीचा एकाचा समावेश

वाठार येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना अटक
आटके येथील दोन जणांचा तर सांगलीचा एकाचा समावेश
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
वाठार येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पेट्रोल पंपावरील कामगारच या दरोड्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. तर दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर एकजण विधीसंघर्ष बालक आले. पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चार मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यातील तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत उर्फ दाद्या सुदाम कदम (रा. सांगली), किशोर चव्हाण व परशुराम दुपटे दोघेही (रा. आटके, ता. कराड) अशी त्यांची नावे असल्याची माहिती कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
ते कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जगताप पुढे म्हणाले, वाठार ता. कराड गावच्या हद्दीतील श्री गणेश पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री दोघांनी दुचाकीवरून येऊन पेट्रोल भरण्याचा बहाणा करीत पंपावरील कामगारावर कोयत्याने हल्ला करून त्यांचे पैशाची बॅग हिसकावून घेऊन पळून गेले होते. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी भेट दिली होती. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या दोन टीम व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम अशा तीन टीम संशयितांचा शोध घेत होत्या. पेट्रोल पंपावरील मिळालेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित आरोपीची सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ओळख पटवण्यात कराड पोलिसांना यश आहे. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस संशयितांचा शोध घेत होते. संशयित रेकॉर्डवरील असल्याने वेळोवेळी आपले लोकेशन बदलत होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार व त्यांची टीम सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशी चार जिल्ह्यात संशयिताचा पाठलाग करीत होती. त्यानंतर रोहित कदम यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपूस करत असता सुरूवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मीच मोटारसायकल वरून येऊन हल्ला करून पैशाची बॅग हिसकावून घेवून घेतल्याची कबुली दिली. त्याचेबरोबर मोटार सायकल चालविणारा आगाशिवनगर येथील असल्याचे त्याने सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किशोर चव्हाण असल्याचे त्याने सांगितले. किशोर चव्हाण याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पेट्रोल पंपावर काम करणारा परशुराम दुपटे याचेशी किशोर याने संगणमत करून गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, एक दुचाकी व चार मोबाईल हस्तगत करून तिघांना अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, विनोद माने, किरण बामणे, रविंद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव यांनी केली.