
महिला विकास मंचच्या 54 व्या महिला मेळाव्याचे मलकापूर येथे भव्य आयोजन
डॉ.सौ.स्वाती थोरात
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
श्री. मळाई देवी शिक्षण संस्था,श्री. मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था,मर्यादित जखिणवाडी, मलकापूर, नांदलापूर,कापील व श्री मळाई महिला विकास मंच,मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीतील महिलांसाठी आयोजित केलेला सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय महिला दिन व 54 वा महिला मेळावा शनिवार दिनांक 8/03/2025 रोजी दुपारी 3.30 वाजता आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूरच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे.
मेळावा कोणासाठी?… कशासाठी?… व का? ….
मणिपूर,हाथरस,बदलापूर, कोलकत्ता,स्वारगेट, मुंबई….. या सारख्या महिलांसाठीच्या गंभीर स्वरूपातल्या घटना …गर्भजल परीक्षण,गर्भपात, बाललैंगिक अत्याचार,छेडछाड, हजारोंनी बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला, लवजिहाद, सायबर गुन्हेगारी, तस्करी, बलात्कार, घरगुती सामूहिक हिंसाचार इत्यादी… समस्या समस्त स्त्री वर्गापुढे आ वासून उभ्या आहेत.
सध्या मुली व स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. *सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या* पार्श्वभूमीवर मुली व स्त्रियांवरील घरगुती आणि सार्वजनिक स्थळांमध्ये या असुरक्षिततेच्या काळ्या मेघांचे मळभ दाटून आले आहे. पालकांवरील वाढता आर्थिक बोजा व त्यातून वाढली जाणारी व्यस्तता यातून पाल्याचा सर्वांगीण विकास व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे.मोबाईलवरील समाज माध्यमांचा पाल्याकडून होणारा गैरवापर,अल्पवयीन मुला-मुलींचे आयुष्य भरकटवून टाकत आहे. नेत्र विकार,एकटेपणा मनोविकृती सर्व वयोगटातील लैंगिक विकृती,ढासळत चाललेली नितीमत्ता,अल्पवयीन मुली व महिलांची बेपत्ता होण्याची प्रकरणे, विकृत सामूहिक लैंगिक अत्याचार, गुन्हेगारांची वाढती मुजोरी पाहता अल्पवयीन मुले-मुली व महिला सुरक्षित कसे राहणार?
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी आपापल्या व्यस्ततेतून दर्जेदार वेळ कसा द्यावा? वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी परिवारातील सर्व पालकांची वर्तणूक मार्गदर्शन कसे राहावे ? विद्यार्थी पालक व शिक्षक या तिन्ही स्तंभांचे परस्पर संबंध कसे दृढ करावे? सर्व पाल्यांच्या सुरक्षेसाठी व व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकांची कर्तव्ये काय असावीत? या संदर्भाने समस्त स्त्री पालक वर्गासाठी मार्गदर्शनपर महिला मेळावा आयोजित केल्याचे श्री मळाई महिला विकास मंच मलकापूरच्या प्रमुख डॉ.सौ.स्वाती थोरात यांनी सांगितले.
“भय इथले संपत नाही” या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील समस्त स्त्री वर्गाच्या समस्या त्यावरती उपाय योजना याबाबत… मा. शेती मित्र श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष मा.अशोकराव थोरात हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून ते समस्त महिला वर्गांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सौ.वैशाली कडूकर या प्रमुख पाहुण्या महिला वर्गांना मार्गदर्शन करणार आहेत.
श्री मळाई महिला विकास मंच आयोजक डॉ.सौ स्वाती थोरात तसेेच विकास मंचच्या सर्व महिला सदस्यांनी या महिला मेळाव्याचा लाभ पंचक्रोशीतील महिलांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमास मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ.अरुणादेवी पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ,रेखा देशपांडे,कराडच्या निर्भया पथक प्रमुख सौ.दीपा पाटील,भरोसा सेल कराड शहर पोलीस स्टेशनच्या हसीना मुजावर,कुसुमताई पुजारी,शकुंतला धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.