घोगाव यात्रेत दोन ठिकाणी मारामारीच्या घटना दोनजण जखमी; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

घोगाव यात्रेत दोन ठिकाणी मारामारीच्या घटना
दोनजण जखमी; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
घोगाव (ता. कराड) येथील बळसिद्धनाथ देवाची यात्रा २७ व २८ फेब्रुवारी रोजी पार पडली. या यात्रेत दोनठिकाणी झालेल्या मारामारीत दोनजण जखमी झाले असून ९ जणांविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश रामचंद्र सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरूवारी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास सुर्यवंशी भावकीची मानाची सासनकाठी हनुमान मंदिराच्या पाठीमागे नाचवत होते. त्याचवेळी समोर साळुंखे भावकीतील लोक त्यांची सासनकाठी नाचवत होते. त्यावेळी संदिप साळुंखे, सुनिल साळुंखे व प्रतिक साळुंखे यांनी नाचत असताना प्रकाश सुर्यवंशी यांना धक्का मारला. यावेळी प्रकाश सुर्यवंशी यांनी तुम्हाला नीट नाचता येत नाही का, तुम्ही मला धक्का का मारला अशी विचारणा केली. यावरून त्यावेळी प्रतिक साळुंखे याने तुझी लय नाटके झाली म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच संदिप साळुंखे, प्रतिक साळुंखे, सुनिल साळुंखे, संतोष साळुंखे, निलेश साळुंखे, प्रथमेश भेदाटे, मंगेश साळुंखे यांनी संगनमत करून प्रकाश सुर्यवंशी यांना शिविगाळ, दमदाटी करून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रकाश सुर्यवंशी यांची चैन गहाळ झाली आहे.
तर प्रद्दुम्न कृष्णदेव साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ रोजी पहाटे ४.३० वाजता यात्रा संपल्यानंतर ते बाळसिद्ध मंदिरासमोर उभे राहिले असताना गावातीलच प्रथमेश भेदाटे हा काही कारण नसताना प्रद्दुम्न साळुंखे यांच्याकडे पाहून शिव्या देवू लागला. यावर साळुंखे यांनी तू मला शिव्या का देतो असे विचारले असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी तिथे उभा असलेल्या सुमित जालिंदर शेवाळे याने साळुंखे यांना शिवीगाळ दमदाटी करीत लाकडी दांडके व दगडाने मारहाण केली. यात प्रद्दुम्न साळुंखे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रथमेश भेदाटे व जालिंदर शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.