
अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या पहिल्या शाखेचा भव्य शुभारंभ कराड येथे उत्साहात
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या पहिल्या शाखेचा भव्य शुभारंभ कराड येथे उत्साहात पार पडला. शाहू चौक येथील समर्थ प्राइड येथे झालेल्या या समारंभात गुरुवर्य १०८ प.पु. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज (मठाधिपती, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव) यांच्या शुभहस्ते व प.पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज (महालिंगेश्वर मठ संस्थान, करवडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी प.पु. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अहिल्यादेवी बँकेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे यांचे विशेष कौतुक करत, शिवसमर्थ मल्टीस्टेट प्रमाणेच अहिल्यादेवी बँक देखील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
बँकेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत बँकेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अहिल्यादेवी बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यास कटिबद्ध आहे. बँकेच्या ग्राहककेंद्रित धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. विशेषतः, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बँक विविध योजनांचा अवलंब करणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न असेल.
अहिल्यादेवी बँक अत्याधुनिक कोअर बँकिंग प्रणालीसह ग्राहकांना ATM / NEFT / RTGS सेवा, SMS बँकिंग सेवा, तज्ञ व अनुभवी सेवकवर्ग, रु. ५ लाखांपर्यंत ठेवींसाठी विमा संरक्षण, चेक आणि डिमांड ड्राफ्ट सुविधा, वातानुकूलित कार्यालय, तसेच ज्येष्ठ नागरिक व संस्थांसाठी मुदत ठेवींवर ०.५०% जादा व्याजदर अशा विविध सेवा उपलब्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत चव्हाण यांनी केले. त्यांनी सांगितले की, शिवसमर्थ परिवाराचे मार्गदर्शन अहिल्यादेवी बँकेसाठी मोलाचे ठरेल. शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अनेक शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहेत, आणि याच परिवाराचे कुटुंबप्रमुख अँड जनार्दन बोत्रे साहेब या अहिल्यादेवी सहकारी बँक चे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक अल्पावधीत जनमानसात नावलौकिक प्राप्त करेल.
या शुभारंभ सोहळ्याला शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हा. चेअरमन शिवाजी सुर्वे, माजी आमदार आनंदराव पाटील, युवा उद्योजक दत्तात्रय देसाई, दिलीपराव चव्हाण, महेश पाटील, आर टी स्वामी, डॉ. अमित बोत्रे,आशिष थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक व्यापारी तसेच सहकार,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. संदीप डाकवे यांनी मानले.