सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कराडमध्ये अत्याधुनिक लेझर क्लिनिकचे उद्घाटन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
प्रगत लेझर तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्या विविध आरोग्य समस्यांवर प्रभावी उपचार करू शकणारे लेझर क्लिनिक आता सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडमध्ये सुरू होत आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रूप मेडिकल डायरेक्टर, डॉ. सुनील राव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी, संचालक दिलीपभाऊ चव्हाण,जनरल सर्जन डॉ. केदार गोरड, युरोसर्जन डॉ. युगल जैन, आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. दिग्विजय घोडके इत्यादी मान्यवर तज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत लेझर क्लिनिकचे महत्त्व, त्याचे फायदे, तसेच कराड, सातारा आणि आसपासच्या भागातील लोकांची होत असलेली सोय यावर चर्चा करण्यात आली.
या क्लिनिकमध्ये यापुढे व्हेरीकोज व्हेन्स, पाईल्स, फिशर्स, फिस्चुला, किडनी स्टोन अशा सामान्य पण अतिशय त्रासदायक ठरणाऱ्या आजारांवर प्रभावी उपचार करता येतील. या अत्याधुनिक लेझर उपकरणांमुळे उपचारांची अचूकता वाढेल आणि रुग्णांचा त्रास लक्षणीयरित्या कमी होईल. विशेषतः जनरल सर्जरी, यूरोलॉजी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी या शाखांमध्ये या क्लिनिकचे अधिक प्रभावी परिणाम दिसून येतील.
सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे अत्याधुनिक लेझर क्लिनिकचे उद्घाटन सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रूप मेडिकल डायरेक्टर, डॉ. सुनील राव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी लेझर तंत्रज्ञानाची गरज आणि फायदे स्पष्ट करताना डॉ. राव म्हणाले,“सुपर स्पेशालिटी लेझर क्लिनिक कराड-सातारा भागातील रुग्णांसाठी प्रगत आरोग्यसेवेची संधी उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे त्यांना मोठ्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. अद्ययावत लेझर तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित, जलद, आणि अचूक होऊन रुग्णांना वेदना कमी व जलद बरे होण्याचा अनुभव मिळेल. हे क्लिनिक स्थानिक आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करेल.”
याप्रसंगी बोलताना दिलीपभाऊ चव्हाण, संचालक, सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, यांनी संगीतले, “ही नवीन सुविधा म्हणजे आधुनिक आणि प्रगत आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. कराड येथे ही सुविधा उपलब्ध करून देऊन आम्ही कराड, सातारा आणि आजूबाजूच्या भागातील रुग्णांसाठी वेदनेपासून मुक्ततेसाठी नवीन आशा घेऊन आलो आहोत.”
डॉ. अमित माने, युनिट हेड, सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कराड यांनी लेझर तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी सांगितले, “लेझर उपचार पद्धतींमुळे सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेत रुग्णांचा त्रास खूपच कमी होतो. मूळव्याध, भगेंद्र (फिशर), फिस्टुला, किडनी स्टोन आणि व्हेरीकोज व्हेन्स यांसारख्या विकारांवर लेझर उपचार अचूक, वेदनामुक्त आणि जलद बरे होण्यास मदत करणारे ठरतात. लेझरमुळे मूतखड्यांचा वेगाने नाश होतो आणि प्रक्रिया अधिक अचूक होते. याशिवाय, टाके किंवा मोठ्या शस्त्रक्रियेची गरज नसल्याने रुग्णांना त्वरित दैनंदिन कामांसाठी परतता येते. संसर्गाची शक्यता कमी असल्याने उपचार अधिक सुरक्षित ठरतात. ऑगस्टपासून आम्ही १०० पेक्षा अधिक वेरीकोज वेन्स आणि १५ मूळव्याध संबंधित रुग्णांवर यशस्वी लेझर उपचार केले आहेत. या तंत्रज्ञानाचा रुग्णांवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसतो, ज्यामुळे रुग्णांचा वेळ, खर्च आणि त्रास कमी होण्यास मदत होते.”
पत्रकार परिषदेत हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी लेझर उपचारांच्या फायद्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. लेझर उपचार कशाप्रकारे काम करतात, इतर उपचारांपेक्षा ते अधिक प्रभावी ठरत असल्याने त्यातून रुग्ण कशाप्रकारे वेदनामुक्त होतात यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, ही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा कराड आणि सातारा भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सुपर स्पेशालिटी लेझर क्लिनिकचे उद्घाटन हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी ग्वाही डॉक्टरांनी यावेळी बोलताना दिली.