दिव्यांगांच्या विकासासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध
गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे; ‘डे केअर सेंटर, कराडचे उद्घाटन
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शाळा व शिक्षकांसह पालकांचेही सहकार्य असणे तितकेच गरजेचे असून या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी केले.
बनवडी (ता. कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मंगळवार, दि. 3 रोजी ‘डे केअर सेंटर,कराड’चे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटसाधन केंद्र कराडचे गट समन्वयक नितीन जगताप, सदाशिवगड बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे, बनवडी केंद्राचे केंद्रप्रमुख मधुसूदन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी श्री. मोरे यांनी
कराड विकास गटातील तीव्र व अति तीव्र दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे व त्यांचा कौशल्य विकास करणे हा या डे-केअर सेंटरचा उद्देश्य असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून केंद्रासाठी स्वखर्चाने आवश्यक साहित्यही भेट दिले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व बनवडी शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका लतिका गावडे, प्रास्ताविक केशव चौगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र, कराड येथील सर्व टीमचे सहकार्य लाभले.