जीवनशैली

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
मुंबई : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. या मतदारसंघात आत्तापर्यंत केवळ तीनच लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असून, हे तिघेही लोकप्रतिनिधी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिले आहेत. यापैकी गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा या निवडणुकीत भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ३९,३५५ मतांनी पराभव करत देदीप्यमान विजय संपादन केला. या ऐतिहासिक विजयात कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविण्यात यशस्वी झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
दरम्यान, आज मुंबईत नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबईत ना. देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ना. फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांचा या शानदार विजयाबद्दल विशेष सत्कार केला. तसेच डॉ. भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि भाजपचे नेते, देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, गृहमंत्री ना. अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पक्षश्रेष्ठींच्या भक्कम पाठबळामुळे, महायुतीतील भाजपसह सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमामुळे हे यश संपादन करता आल्याचे सांगितले. येत्या काळात भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »