जीवनशैली

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
राज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची नसून, ती दोन विचारांची आहे. एका बाजूस शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जोपासणारी महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडून पुन्हा वर्णव्यवस्था आणणारे जातीयवादी भाजप या दोन विचारांची ही लढाई आहे. याच जातीयवादी मंडळींना कराडकरांनी दोनदा हद्दपार केले. आता तिसऱ्यांदा जातीयवादी शक्तींना पराभूत करून कराड दक्षिणेचा काँग्रेसचा गड शाबूत ठेवा. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील मंगळवार पेठ व बुधवार पेठ येथील पदयात्रेनंतर महात्मा फुलेनगर येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, कराडचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, शितल वायदंडे, ज्ञानदेव राजापुरे, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, डॉ. मधुकर माने, अक्षय सुर्वे, अॅड. राम होगले, झाकीर पठाण, जुबेर मोकाशी, ऋतुराज मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख शशिराज करपे, रमेश वायदंडे, हणमंत घाडगे, युवराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, कराड शहराने आजपर्यंत समता आणि बंधुता जपणाऱ्या विचारांची पाठराखण केली आहे. तुम्हाला नोकऱ्या देतो, यासारखी भली मोठी आश्वासने दिली जातील. परंतु करडची जनता कधीही आपला स्वाभिमान विकणार नाहीत. विरोधकांकडे वाममार्गाने पैसा आला आहे. ते या पैशाचा वापर मते विकत घेण्यासाठी करतील. परंतु कराडची जनता त्यांच्या पैशाची दहशत मोडून काढतील, असा मला विश्वास आहे.
ते म्हणाले, राज्यातील सरकारने अनेक पातळीवर भ्रष्ठाचार केला. स्पर्धा परीक्षेतही या सरकारने दिलेल्या एजन्सीनी गोंधळ केला. आमचे सरकार आल्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डवडेवून पेपर फुटीवर कडक शिस्त लावणार आहे. मालवणमध्ये उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. या मंडळींनी छत्रपतींना सोडले नाही. ते तुम्हा – आम्हाला काय सोडणार.
ते म्हणाले, विरोधक तुम्हाला मतदान करू देणार नाहीत. तुम्हाला पैशाचे आमिष दाखवतील. तुम्ही तुमचा स्वाभिमान विकणार नाही, याची प्रतिज्ञा करा. त्यांना तुम्ही दोनदा बाहेरचा रस्ता दाखवला. आता तिसऱ्यांदा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज रहा.
राजेंद्र शेलार म्हणाले, कराड शहराने राज्याचे आणि देशाचे नेतृत्व केले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी जीवन वेचलेले नेते आहेत. त्यांना निवडून द्या. व कराड शहराचा नावलौकिक टिकवा.
डॉ. मधुकर माने म्हणाले, राग आणि द्वेशामुळे सत्यानाश होतो. जातीयवादी लोकं खोटा प्रचार करत आहेत. काँग्रेसने वंचितांचे हक्क टिकवून ठेवले. पृथ्वीराज बाबांना देश ओळखतो. त्यांच्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे. त्यांना साथ देणे, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिवाजीराव सन्मुख, बबनराव जाधव, शिवराज मोरे, अक्षय सुर्वे, प्रा. अमित माने, फारुख पटवेकर यांची भाषणे झाली.
यावेळी अक्षय सुर्वे व रियाज नदाफ यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांचा आ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ओंकार माने यांनी स्वागत केले. युवराज भोसले यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वायदंडे यांनी आभार मानले.
संतोष थोरवडे म्हणाले, वडगाव हवेलीच्या सभेत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज बाबांच्या घराशेजारील झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना हे माहिती नाही की, २०१७ मध्येच १५२ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित लोकांची सदनिका ताब्यात घेण्यासाठी लागणारा स्वानिधी भरण्याची अवस्था नसल्याने ती लोकं नवीन घरात गेलेले नाहीत. या मुद्यावर ते निव्वळ खोटे सांगत आहेत. विरोधी उमेदवारावर बिरोबा कोपला आहे. त्यामुळे त्यांना गुलाल कधीच मिळणार नाही. अतुल भोसले हे पहिल्यांदा कराड उत्तरेत उभे राहिले आणि बालवाडीत नापास झाले. त्यानंतर कराड दक्षिणेत पहिलीत आले, आणि पुन्हा नापास झाले. त्यानंतर दुसरी आणि आता तिसरीत तिसऱ्यांदा नापास करायचे कराडकारांनी ठरवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »