जीवनशैली

बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा: चित्रा वाघ

बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा:चित्रा वाघ
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया – बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.
ओंड (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब), भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चित्राताई वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. त्यांनी संविधान हटवण्यात येणार असल्याची आवई उठवली. तसेच गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. मात्र, मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य – चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही. देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या, करोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला केवळ सल्ले देण्याचे काम केले. तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेसाठी काय केले, हे पहा. याउलट डॉ. अतुलबाबा भोसले हे करोना कालावधीत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले. त्यांना आधार दिला, जनतेची सेवा केली. या मतदारसंघातील दीड लाख बहिणी जर अतुलबाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या; तर त्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या. मात्र, अडीच वर्षांत महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही चांगली योजना आणली नाही. याउलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले. लाडकी बहीण योजनेला येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याचाही दावाही त्यांनी केला. मग ते मुख्यमंत्री असताना पावणेचार वर्षांत महिलांच्या खात्यावर एकही पैसा आला का? अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला का? असा सवाल उपस्थित करत भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.
रोहिणी शिंदे म्हणाल्या, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
सुरभीताई भोसले म्हणाल्या, करोना कालावधीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता – भगिनी, तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे, त्यांना मोलाची मदत केली. कराडला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर, तसेच पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यावर डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून आले. बांधकाम कामगार आणि लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळवून दिला. आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »