जीवनशैली

उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार डॉ. अतुल भोसले; वडगाव हवेली येथे प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार
डॉ. अतुल भोसले; वडगाव हवेली येथे प्रचाराचा दणक्यात शुभारंभ
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हणत कराडचे लोकप्रतिनिधी या योजनेची अवहेलना करतात. तर दुसरीकडे ही आमचीच योजना असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री असताना त्यांनी योजना का आणली नाही? असा टोला लगावत त्यांच्या पाटण कॉलनीतील घरालगतची झोपडपट्टी त्यांना हटवता आली नाही. मला संधी मिळाल्यास आपण येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करु. तसेच कराडमध्ये एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून मोठे उद्योग, व्यवसाय आणून, रोजगार निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
वडगाव हवेली (ता. कराड) येथे भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत
करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आ. आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, जयवंत पाटील, जयवंत शेलार, आप्पासाहेब गायकवाड, शेतीमित्र अशोकराव थोरात, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव,माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, रणजीत पाटील, पै. धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, २०१९ च्या अपयशाने खचून न जाता लोकसेवेचे काम सुरु केले. करोनाच्या लाटेत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले. सुरेशबाबांनी लोकांची अखंड सेवा केली. कराड दक्षिणच्या विकासासाठी
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून मी ७४५ कोटींचा; तर मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून २५० कोटींचा विकासनिधी आला आहे. यातील बहुतांश कामाचे भूमीपूजन, उद्‌घाटन व लोकार्पणही आपण केले आहे. १० हजार बांधकाम कामगारांना, तसेच सर्वसामान्य माणसांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून दिला. कराडच्या स्टेडियमसाठी ९६.५० कोटींचा निधी आणला. पण माजी मुख्यमंत्री फक्त १० लाख आल्याचे धादांत खोटं बोलत असल्याचे सांगत ते माझ्यावर टीका करण्यात वेळ घालवत आहेत. यावरून आमचं कामच बोलत असल्याने त्यांना या स्तराला यावे लागले आहे. तुमच्या काळात तुम्हाला मतदारसंघात मोठे उद्योग आणता आले नाहीत आणि आता आय.टी. हब करण्याची खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल कशासाठी देताय? असा सवाल डॉ. भोसले यांनी उपस्थित केला.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, निवडणुकीचे मुद्दे बाजूला ठेऊन प्रचार दुसऱ्याच दिशेला नेण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यांच्या हातून आत्तापर्यंत काहीही विकास झाला नसल्यानेच त्यांच्यावर तसे करायची वेळ आली आहे. येत्या काळात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे प्रकल्प येथे आणण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहनराव जाधव, आनंदराव पाटील, जगदीश जगताप यांचीही भाषणे झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »