आप्पासाहेब देसाई यांच्या अडचणींत वाढ वसंतदादा पाटील शैक्षणिक संस्थेतील प्रकरण
आप्पासाहेब देसाई यांच्या अडचणींत वाढ वसंतदादा पाटील शैक्षणिक संस्थेतील प्रकरण
मुंबई:ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
सायनमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेमध्ये पाच कोटींचा अपहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. संस्थेची सायन येथील जमीन आणि इमारत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तारण ठेवून ३० कोटी रुपये कर्ज मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
यापूर्वी वडाळा टी. टी. पोलिसांनी या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून डिसेंबर २०२२ मध्ये देसाई यांच्यासह अन्यसंबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींवर संस्थेचा ताबा घेणे, संस्थेच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरफार करून सभासद नोंदणी करणे, बोगस खाती उघडून निधीचा अपहार करणे, यात पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फाळके यांनी डिसेंबर, २०२१ मध्ये आयोजित केलेल्या संस्थेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने ठराव करून देसाई यांचे संस्थेमधील सभासदत्व रद्द करून त्यांना जनरल सेक्रेटरी आणि कार्यकारी समिती सदस्य पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, देसाई आणि मुंबै बँकेचे नंदकुमार काटकर यांनी संस्थेमध्ये घुसखोरी करून बनावट रेकॉर्डच्या आधारे स्वतः अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी असल्याचे भासवल्याचा आरोप आहे.
संस्थेची सायन येथील जमीन आणि इमारत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तारण ठेवून रुपये ३० कोटी कर्ज मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाला संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके यांच्यासह अन्य पदाधिकऱ्यांनी आक्षेप घेतला.
यावर सुनावणी होऊन सहधर्मादाय आयुक्त यांनी २६ सप्टेंबरला निकाल देत अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्यावर संस्थेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा देत नंदकुमार काटकर यांची अध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांनी कर्जाची परवानगी मिळण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर केला आहे.