विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांची उत्कृष्ट कामगिरी
विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांची उत्कृष्ट कामगिरी
संपर्क संस्थेने आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे विश्लेषण करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
विधिमंडळात मराठा आरक्षण, अर्थसंकल्प आदिसह विविध विषयांवर अभ्यासू भाषणे
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
राज्याच्या मावळत्या चौदाव्या विधानसभेतील २८८ आमदाराच्या अधिवेशन काळातील कामगिरीचे विश्लेषण करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ आमदारांत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करण्यात पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण १३६ प्रश्न विधिमंडळात मांडले आहेत.
संपर्क संस्थेने २०१९ ते २०२४ या चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात पार पडलेल्या अधिवेशनांत आमदारांनी उपस्थित केलेले तारांकित प्रश्न व लक्षवेधी याच्या आधारे विश्लेषण केले आहे. त्यात सातारा जिल्हा पातळीवर कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. मतदारसंघातील तसेच राज्यातील प्रमुख प्रश्न ऑनलाईन पद्धतीने मांडले जातात त्यापैकी जे प्रश्न बॅलेट पद्धतीने निवडले जातात असे प्रत्यक्ष प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विधानसभेत विचारले गेले आहेत. त्यानुसार हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले असून जनतेने मताधिकार बजावत असताना आमदारांची सभागृहातील कामगिरी तपासावी. जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब अधिकाधिक प्रमाणात सभागृहात उमटावे, त्याची तड लागावी, यासाठी आपल्या प्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, या हेतुने संपर्क संस्थेने गेल्या पाच वर्षातील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे विश्लेषण केले आहे.
सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ आमदारांत सर्वाधिक प्रश्न मांडण्यात पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 136 प्रश्न सभागृहात मांडले. पृथ्वीराज चव्हाण मावळत्या विधानसभेत पहिली अडीच वर्षे सत्ताधारी महाविकास आघाडीत होते. तर नंतरच्या अडीच वर्षांत विरोधी बाकावर होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सरकारपुढे बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळाली.
स्थानिक प्रश्न मांडताना कृष्णा व कोयना नदीचे प्रदूषण, कराड व मलकापूरला स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी वारूंजी येथे बंधारा, शेंद्रे ते कागल महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन धारकांना येणाऱ्या अडचणी, पाटण तालुक्यातील भूस्खलन, कराड बसस्थानकातील दुरूस्ती, कराड विमानतळाचे विस्तारीकरण असे महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
शेवटच्या अर्थसंकल्पावर चव्हाण यांनी केलेले भाषण अभ्यासपूर्ण होते. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर यातील त्रुटी
सभागृहात मांडून सरकारला यासंबंधी अध्यादेश काढण्यास भाग पाडले. त्यांच्या सूचनेमुळेच लाडकी बहीण योजनेची मुदत व वयोमर्यादा वाढविण्यात आली.
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून चर्चा सुरू असताना आ.चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातर्फे केलेले भाषणही सर्वाधिक लक्षवेधी ठरले.