पृथ्वीराज चव्हाण हेच कराड दक्षिणचे आश्वासक नेतृत्व : विश्वजित कदम कराड दक्षिण मधील विकासाची अखंडित परंपरा कायम ठेवा
पृथ्वीराज चव्हाण हेच कराड दक्षिणचे आश्वासक नेतृत्व : विश्वजित कदम
कराड दक्षिण मधील विकासाची अखंडित परंपरा कायम ठेवा
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व हे केवळ कराड दक्षिणेचे नाही, तर हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राचे व काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे. त्यांची दूरदृष्टी निर्णय क्षमता राज्याला दिशादर्शक ठरली आहेच पर्यायाने कराड दक्षिण साठी सुद्धा निर्णायक ठरली आहे. म्हणूनच मोठ्या आशेने या नेतृत्वाला राहुल गांधी येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ताकद देणार आहेत, यात कोणालाही शंका नाही. असे सांगून पृथ्वीराज बाबांसारखे परखड नेतृत्व निर्भयपणे कोणाचीही भीती न बाळगता जे सत्य आहे ते मांडत असतात, सरकारला धारेवर कसे धरायचे, सरकार जर महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात व सर्वसामान्य लोकांच्या विरोधात काम करत असेल, तर सरकारला जाब विचारण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून आपल्याला हे व्यक्तिमत्व कराड दक्षिणमधून राज्यभर फिरण्यासाठी मोकळे ठेवले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रभर फिरावे, त्यांची राज्याला गरज आहे. परंतु ते जर राज्यभर फिरायचे असतील, तर प्रत्येकाने मी पृथ्वीराज चव्हाण आहे, असे समजून ही माझी निवडणूक हाती घ्यावी. व प्रत्येकाने पृथ्वीराजबाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा मनाशी चंग बांधला तर कराड दक्षिणेचा अधिक चांगला विकास होईल. असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री आ. विश्वजीत कदम यांनी केले.
आकुर्डी (पुणे) येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पुणेकर व पिंपरी – चिंचवडकर रहिवाशांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, पिंपरी – चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अजितराव पाटील – चिखलीकर, सातारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, शंकरराव खबाले, नामदेवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. विश्वजीत कदम म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला गौरवशाली इतिहास आहे. तशीच या मतदारसंघाला मोठी राजकीय परंपरा लाभली आहे. ही राजकीय परंपरा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जपली आहे. या मतदारसंघाशी आमचे जवळचे नाते आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्याचा ठसा वेगळ्या भावनेने निर्माण केला. तो आजही सर्वांच्या लक्षात राहिला आहे.
ते म्हणाले, राज्यातील राजकारणाला गालबोट लागले आहे. या बिकट परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सरकार आणताना पृथ्वीराजबाबा हे राज्याचे नेतृत्व म्हणून मानले आहेत. येत्या काळात राहुल गांधी या नेतृत्वाला मोठी ताकद देणार आहेत. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघावर मोठी जबाबदारी आहे.
ते म्हणाले, कोणत्याही सरकारला जाब विचारण्याचे धाडस त्यांच्याकडे आहे. त्यांना आपण मोकळीक दिली पाहिजे. येणारी निवडणूक कराड दक्षिणच्या अस्मितेची निवडणूक आहे. प्रत्येकाने मी पृथ्वीराज चव्हाण आहे, या भावनेने ही निवडणूक हाती घ्यावी. व मतदारसंघाची वैचारिक परंपरा जपावी. संपूर्ण महाराष्ट्र पृथ्वीराजबाबांच्या पाठीशी आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवून मतदारसंघाची पारंपरिक जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी. त्यांच्याकडे राज्यातील महत्वाची जबाबदारी येणार आहे. जे बोलले, ते बाबांनी करून दाखवले. ते नेतृत्व राज्यात आपल्याला पुढे न्यायचे आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, येणारी निवडणूक राज्याच्या भवितव्यकरिता अत्यंत महत्वाची आहे. गेली दहा वर्षे हरवलेली आहेत. गेल्या दहा वर्षात एकही परकीय कंपनी महाराष्ट्रात आलेली नाही. याआधी औद्योगिकदृष्टया राज्य अग्रेसर होते. ही पिछेहाट थांबवायची असेल, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्या.
ते म्हणाले, राज्यावर सद्या दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोकांना पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कामगार भरती सुरू आहे. केंद्र सरकार कांद्यावर निर्बंध लादत आहे. शेतात पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. ही परिस्थिती बदलावी लागेल, यातून लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने निर्णायक कौल दिला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हीच परिस्थिती राहणार असून, आघाडीला १८३ पेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात आमचे सरकार नसल्याने कराड दक्षिणचा फारसा विकास करता आला नाही. येणाऱ्या काळात सरकार बदलेल व कराड दक्षिणचा गतीने विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, कराड दक्षिणमध्ये नेतृत्व तेच ठेवण्याची १९५२ सालापासून चालत आलेली परंपरा खंडीत करू नका. विलासराव पाटील – उंडाळकर यांनी प्रस्थापित लोकांना विरोध करत सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता राबवली. येणाऱ्या निवडणुकीची वेळ निर्णायक आहे. व त्यामध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी.
अजितराव पाटील – चिखलीकर व प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. प्रमोद थोरात यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक तात्यासाहेब शेवाळे यांनी आभार केले.