डॉ.अभिजीत सोनवणे,डॉ.मनिषा सोनवणे व अॅड.सौ.राणी चोरे यांना जनकल्याण गौरव पुरस्कार जाहीर
माजी,आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण : अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कराड तर्फे देण्यात येणाऱ्या “ चौथ्या जनकल्याण गौरव पुरस्कारासाठी ” यंदा भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून सुपरीचित असलेले सेवाभावी दांपत्य डॉ.अभिजीत व डॉ.मनीषा सोनवणे, पुणे यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या वतीने पथदर्शक सामाजिक काम करणाऱ्या संस्थेस अथवा व्यक्तीस दरवर्षी जनकल्याण गौरव पुरस्कार देवून गौरविले जाते. नि:स्पृहपणे सामाजिक कार्य करणा-या व्यक्ती अथवा संस्था यांच्या कार्याची ओळख समाजास यानिमित्ताने व्हावी आणि अशा कार्यास प्रेरणा मिळावी असा हेतू या मागे आहे.
“सोहम” सोशल हेल्थ अँन्ड मेडिसीन ट्रस्ट, पुणे चे डॉ.सोनवणे दांपत्य हे पुण्यामध्ये भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून सुपरीचित आहेत. रस्त्यावर भिकमागणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा जाग्यावर देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करणे. त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यांची शैक्षणिक जबाबदारी स्विकारणे अशा प्रकारचे सामाजिक सेवाभावी दात्तृत्व स्विकारलेले दांपत्य सुपरीचित आहे.
संस्थेच्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून चाणक्य मंडळाचे संस्थापक, संचालक श्री. अविनाश धर्माधिकारीसाो (IAS) यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
तसेच “आकांक्षा” एज्युकेशन फौंडेशन, शिरुर च्या अध्यक्षा अॅड. सौ. राणी चोरे एका महिलेने सर्व अडथळ्यांवर मात करीत स्वत:च्या दोन्ही मतिमंद व विकलांग मुलींच्या पालकत्वासाठी घेतलेले शिक्षण समाजातील अशा अन्य मुलांना उपयोगी पडावे या ध्येयातून राणीताई चौरे यांनी आकांक्षा फौडेशन ही संस्था स्थापन केली असून त्या मार्फत 6 ते 18 वर्ष वयोगटातील बौध्दिक अक्षम मुला-मुलींसाठी विशेष शाळा सुरु केली आहे. शिवाय ही संस्था 18 वर्षापुढील प्रौढ बौध्दिक अक्षम मुला-मुलींसाठी व्यावसायिक कार्यशाळा, पालकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच नाते संबंध सुखकर होण्यासाठी समुपदेशन करते. त्यांची प्रोत्साहनपर विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सदर पुरस्कार मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा श्री संजयकुमार सुद्रिकसाो यांचे हस्ते वितरीत केले जाणार आहे.
सदर पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक 25/09/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता स्व.सौ.वेणुताई चव्हाण सभागृह कराड येथे संपन्न होणार आहे.
तरी सदर सोहळ्यास सर्व सभासद व ग्राहक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.मिलींद पेंढारकर यांनी केले आहे.