व्यवसाय

कृष्णा सहकारी बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश चेअरमन डॉ.अतुल भोसले यांची घोषणा; ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कृष्णा सहकारी बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश
चेअरमन डॉ.अतुल भोसले यांची घोषणा; ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवला असून, बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने धोरण आखले आहे. पारदर्शक काम व धोरणात्मक निर्णयामुळे बँकेला देश व राज्यपातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेत, बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा लाभांश सभासदांच्या बँक खात्यात थेट अदा करत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही केली.
कृष्णा सहकारी बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे, श्रीरंग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, अडचणीच्या काळामध्ये बँक शेतकरी सभासदांच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे लोकांचा बँकेवरील विश्वास वाढला आहे. या विश्वासामुळे बँकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बदलत्या जगामध्ये शेतकरी अल्पभूधारक होऊ लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी नवीन पिढीसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. त्यांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल.
चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, गेली सलग १३ वर्षे बँकेचा ऑडीट वर्ग अ आणि नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने १३०० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच येणाऱ्या अडीच वर्षामध्ये म्हणजे २०२७ पर्यंत २००० कोटींचा व्यवसाय करण्याचा मानस आहे. बँकेच्या प्रगतीत सेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असून, सेवकांच्या हितासाठी बँकेने पगारवाढ, बोनस यासह प्रोत्साहनपर भत्त्याच्या रुपाने चांगले आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन दिले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी अहवाल वाचून दाखविला. सभेला कृष्णा बँकेचे माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, ॲड. विजय पाटील, बाळासाहेब निकम, गजेंद्र पाटील, बबनराव सावंत, संग्राम पाटील, धनाजी थोरात, धनाजी पाटील, संभाजीराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »