‘रयत’चे… लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना नामकरण
28 व्या वार्षिक सभेत एकमताने ठराव मंजूर; गाळप क्षमता वाढ व वीज प्रकल्पामुळे बळकटी
कराड: ग्राम दौलत नेटवर्क –
लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना नामकरणाच्या ठरावास 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिह पाटील – उंडाळकर होते.
शेवाळेवाडी (म्हासोली), ता .कराड येथील कारखाना कार्यस्थळावर ही सभा सपन्न झाली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी – रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, शामराव पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत बोलताना अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक काकांचा असलेला उद्देश सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत. मात्र, त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली 50 वर्षे काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडावा, यासाठी त्यांनी अथणी कारखान्याबरोबर करार केला. त्यास यश येऊन आज रयत शासकीय देणे वगळता पूर्ण कर्जमुक्त झाला आहे. गतवर्षीपासून पाच हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप व वीज प्रकल्प सुरू झाला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी आणखी बळकटी मिळाली आहे. यापुढील काळात रयतच्या माध्यमातून डीस्टलरी प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा करून कर्मचारी, सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने गाळपास आलेल्या उसास तालुक्यात उच्चाकी असा प्रतिटन 3,150 एकरकमी भाव दिला आहे. यावर्षी 8 हजार हेक्टरपेक्षा जास्त ऊस नोंद झाली असून 650 पेक्षा अधिक तोडणी वाहतूक करार झाले आहेत. कारखान्याची ऑफ सिझनची कामे पूर्ण झाली असून गळीत हंगामास सभासद, शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी, संस्थापक स्व. विलासराव पाटील (काका) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेत विषय पत्रिकेचे वाचन शैलेश देशमुख यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. ऐनवेळच्या विषयात कराड पंचायत समितीचे माजी उसभापती रमेश देशमुख यांनी रयत कारखान्याचे संस्थापक विलासकाका पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी कारखान्यास लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा ठराव मांडला. त्यास सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.
प्रास्ताविक संचालक प्रदीप पाटील यांनी केले. तर संचालक ऍड शंकरराव लोकरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. सभेस कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोंद्रे, जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे, हिम्मत पाटील, पंजाबराव देसाई, विजया माने, हिम्मत पाटील, हणमंतराव चव्हाण, निवासराव निकम कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.