कराडमध्ये कृष्णामाईची श्रावणी यात्रा उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराडनगरीचे आराध्यदैवत श्री कृष्णामाई देवीची श्रावणातील सरत्या सोमवारची यात्रा मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात सुरु आहे. कृष्णा-कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमावर श्री कृष्णामाई देवीच्या दर्शनासाठी कराड पंचक्रोशीसह ठिकठिकाणांहून आलेल्या भक्तगणांनी अवघा कृष्णा घाट परिसर बहरून गेला होता.
प्रथेप्रमाणे ठिकठिकाणच्या पालख्या देवाला घेऊन कृष्णामाईच्या भेटीला सवाद्य मिरवणुकांनी आल्या होत्या. कृष्णामाई देवीबरोबरच कृष्णानदीचीही खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी महिला व युवतींनी गर्दी केली होती. दरवेळेप्रमाणे फुलांनी सजवलेल्या कमानी आणि मखरामध्ये भरजरी साडी आणि संपूर्ण सुवर्ण अलंकारांनी भरलेले कृष्णामाईचे सुरेख स्वरूप पाहून भक्तगण धन्य होत होता. प्रसाद, मिठाईसह खाऊ व खेळण्यांच्या दालनांवर मोठी गर्दी राहिली होती.