कॅथलॅबसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती आक्रमक
कराडला शासकीय उपजिल्हा रूग्णालयासमोर मनोज माळी व भानुदास डाइंगडे यांचे बेमुदत उपोषण
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराडला मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच व्हावी, यांसह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षच्यावतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी आज मंगळवारपासून येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोर बेमुदत उपोषण सुउर केले आहे.
दरम्यान, त्यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शासनाच्या वतीने कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब मंजूर करण्यात आली होती. जिथे मेडिकल कॉलेज व पुर्वीची कॅथलॅब नसल्याच्या निकषांवर कराडला कॅथलॅब मंजूर झाली होती. त्यासाठी आवश्यक जागेची पाहणीही झाली होती. मात्र, शासनाच्या वतीने अचानक सर्व निकष गुंडाळून कराडची कॅथलॅब सातारला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रहारच्यावतीने वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली गेली नाही.
याशिवाय, सातारा जिल्ह्यातील बोगस सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्यांबाबत कारवाई करावी, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या जिल्हा मंडळाकडून करण्यात याव्यात, खाजगी रुग्णालय चालवणारे डॉ. राजेश शेडगे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याबाबत, तसेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात बाळ दगावल्याबद्दल डॉक्टर व नर्स यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सातारा जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी सूरू असून संस्था व एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी सदरचे उपोषण सुरू केले आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, पाटण तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, तात्यासो शिंदे, बंटी मोरे, जयदीप आचार्य, दादा कावरे, प्रितेश माने, संस्कार बनसोडे, संग्राम बनसोडे, आदित्य देसाई, अजित पिसाळ, विशाल पाटील, समर्थ कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.