कृष्णा न्यूरोसायन्सेस इन्स्टिट्यूटचे गुरुवारी लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री ना. जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती; जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज
कृष्णा न्यूरोसायन्सेस इन्स्टिट्यूटचे गुरुवारी लोकार्पण
केंद्रीय आरोग्यमंत्री ना. जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती; जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण आणि माफक दरात सर्वोत्तम आरोग्य उपचार सुविधांसाठी ख्यातनाम असलेल्या कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने कृष्णा न्युरोसायन्सेस इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक दर्जाच्या उपचार सुविधांनी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या कृष्णा न्यूरोसायन्सेस इन्स्टिट्यूटचे लोकार्पण गुरुवारी (ता. २२) दुपारी २.३० वाजता केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री ना. जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे हे मान्यवर मंत्री प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले कृष्णा हॉस्पिटल आरोग्य सेवेचा वटवृक्ष आहे. सर्वप्रकारच्या मल्टिस्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये विविध विभागांत एकूण १,२२५ रुग्ण बेड उपलब्ध आहेत. यामध्ये आता २०० नव्या बेडने सुसज्ज अशा कृष्णा न्युरोसायन्सेस इन्स्टिट्यूटची भर पडणार आहे. २०० रुग्ण बेडची क्षमता असलेला हा विभाग भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठा विभाग ठरणार असून, यातील ७० बेड हे धर्मादाय तसेच शासनाच्या विविध मोफत योजनांमधील पात्र लाभार्थ्यांवरील उपचारासाठी राखीव ठेवले जाणार आहेत.
जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या विभागात आशियातील पहिला रोबाटीक एक्सोस्कोप, पहिला रोबोटीक एंडोस्कोपिक होल्डर आणि पहिल्या व्हर्चुअल रिॲलिटी पुनर्रचनेसह १९२ स्लाईसचे इंट्राऑपरेटीव्ह सीटी स्कॅन मशिन उपलब्ध आहे. या विभागात सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. आईप चेरियन यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्याचा दीर्घ अनुभव असलेले सुप्रसिद्ध न्युरोसर्जन व वैद्यकीय तज्ज्ञांची टीम तैनात असणार आहे. या टीमकडून सिस्टर्नोस्टोमी ही अद्ययावत शस्त्रक्रिया पद्धती विकसित करण्यात आली असून, जगभरातील मेंदू शल्यचिकित्सक या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठात येत असतात.
तसेच नव्याने सुरु करण्यात आलेली कृष्णा एस्क्यूलॅप अकॅडमी जगभरातील तरुण न्युरोसर्जनना प्रशिक्षण देण्याचे काम करणार असून, अशाप्रकारची ही भारतातील एकमेव अकॅडमी आहे. या विभागामुळे कराडसह देश-विदेशातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्राप्त होणार आहेत.
या नव्या विभागाच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता. २२) दुपारी २.३० वाजता केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री ना. जे. पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विद्यापीठाचे शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान
जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कृष्णा न्युरोसायन्सेस इन्स्टिट्यूटमध्ये आशियातील पहिला रोबाटीक एक्सोस्कोप, पहिला रोबोटीक एंडोस्कोपिक होल्डर आणि पहिल्या व्हर्चुअल रिॲलिटी पुनर्रचनेसह १९२ स्लाईसचे इंट्राऑपरेटीव्ह सीटी स्कॅन मशिन असे जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या विभागामुळे कराडसह देश-विदेशातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्राप्त होणार आहेत.