गुन्हाजीवनशैली

भर पावसात तब्बल 25 कोटींच्या तडजोडी, 3000 प्रकरणे निकाली राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भर पावसात तब्बल 25 कोटींच्या तडजोडी, 3000 प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराड न्यायालयाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून भर पावसात तब्बल 25 कोटी रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या तर दाखल आणि दाखल पूर्व असे मिळून तब्बल 2927 प्रकरणे निकाली करण्यात आली. कराड तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश यु.एल. जोशी यांच्या नेतृत्वाखाली कराड न्यायालयात संपन्न झालेल्या लोक अदालतीला कराडसह पाटण तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
लोकांमधील वाद सामोपचाराने मिटावे, यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाते. कराड न्यायालयात एकूण प्रलंबित 18150 प्रकरणापैकी 4455 प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती, यापैकी 1449 प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली, वेगवेगळे दावे, चेक बाउन्स प्रकरणे, अपघात प्राधिकरण यासह आर्थिक वाद यांचे जवळपास 24 कोटी 23 लाख 61 हजार 497 रुपयांच्या तडजोडी या लोकन्यायालयात करण्यात आल्या. दाखल पूर्व प्रकरणापैकी 4768 प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती यापैकी 1478 प्रकरणे निकाली निघाली यामध्ये तब्बल एक कोटी 27 लाख 55 हजार 327 रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या. त्यामुळे एकूण 18,150 प्रकरणांपैकी 9223 प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती यापैकी तब्बल 2927 प्रकरणे निकाली निघाली असून 25 कोटी 51 लाख 16 हजार 824 रुपयांच्या तडजोडी या लोकन्यायालयात करण्यात आल्या. तसेच अनेक वैवाहिक वाद व तत्सम प्रकारचे प्रकरणे देखील निकाली निघाले.
ही लोक अदालत यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आता जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक यू. एल. जोशी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कराडात लोकन्यायालयाचे आयोजन केले होते, सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू होती मात्र कराडकर जनतेने दाखवलेला प्रतिसाद अफलातून आहे, भर पावसात कराडकरांनी सामोपचाराने अनेक वाद मिटवले, यामुळे दोन्ही बाजूच्या पक्षकारांना समसमान न्याय मिळाला, खरोखर या विभागातील जनता सुज्ञ असून त्यांनी लोकन्यायालयाचा सन्मान राखत आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला याबाबत मी त्यांची शतशः ऋणी आहे. हे लोक न्यायालय यशस्वी करण्याकरता माझे सहकारी न्यायाधीश, कराड वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य, सर्व न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी,तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर राष्ट्रीयकृत बँका, जनकल्याण पतसंस्था, श्रीराम सिटी युनियन फायनान्स यांच्यासह विविध वित्तीय संस्था, कराड व मलकापूर नगरपरिषद, कराड व मलकापूर परिसरातील ग्रामपंचायत, कराड शहर, कराड तालुका, उंब्रज, तळबीड आणि मसूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, विधी सेवा समिती समन्वयक तथा वरिष्ठ लिपिक आर.डी. भोपते आणि त्यांचे कर्मचारी आणि सर्वसामान्य कराडकर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यामुळेच लोकन्यायालय यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश डी.बी. पतंगे म्हणाले, नालसा मार्फत राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केले जाते, यामध्ये वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होते. तडजोडी अंती दोन्ही पक्षांचा विजय होतो त्यामुळे जय, हार राहत नाही, सर्वांनाच विजयाचे समाधान असते. अतिशय उत्स्फूर्तपणे वेधशाळेने पावसाचा अंदाज दिला असताना सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन लोकन्यायालयास सुंदर प्रतिसाद दिला त्यामुळेच आजचे लोकन्यायालय यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या लोकन्यायालयात जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी, डी. बी. पतंगे, वरिष्ठ न्यायाधीश एस.डी. कुरेकर, श्री घुले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. झेड. सय्यद, पी. एस. भोसले, प्राजक्ता शेलार आणि सौ मोहिते यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »