कष्टकरी महिलांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील : डॉ.अतुलबाबा भोसले ५०० महिला बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप
कष्टकरी महिलांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील : डॉ.अतुलबाबा भोसले
५०० महिला बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
गरीब, कष्टकरी महिलांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून मी कायम उभा आहे. बांधकाम कामगार महिलांनी महायुती सरकारच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कोणतीही बांधकाम कामगार महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मी प्रयत्नशील असून, येणाऱ्या काळात जास्तीत जास्त महिला बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गृहपयोगी साहित्याचे वाटप ५०० महिला बांधकाम कामगारांना डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, की महिला कामगार रोज कष्ट करून, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. या कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून २५०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. जातपात न पाहता, पक्ष – राजकारण न करता प्रत्येक पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जी काही मदत लागेल ती देऊ. कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांनी या योजनेसाठी पात्र लाभार्थींची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, विस्तारक धनाजी माने, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, शहराध्यक्ष विशाल घेवदे, संजयनगर-कालेच्या उपसरपंच सौ. अर्चना साळुंखे, योगेश पाटील, विनायक घेवदे, सागर पाटील, अजित पाटील, अनिल नलवडे, संदीप पाटील, सौ. सुनीता डाईंगडे, सौ. पल्लवी पवार, सौ. तनुजा धुमाळ, सौ. दिपाली शिंगण, सौ. जयश्री पाटील, सौ. जयश्री यादव यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हेमंत पाटील यांनी प्रास्तविक केले. सौ. सुरेखा माने यांनी आभार मानले.