शिक्षण क्षेत्रातील कर्तत्ववान आदर्श व्यक्तीमत्व
श्री. बी.टी.किणीकर सर
यशवंत विद्यापीठ कराड व प्रियदर्शिनी शिक्षण संस्था कराडचे संस्थापक सेकेटरी श्री बी.टी. किणीकर सर आज वयाच्या 87 व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत त्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे
श्री.बी.टी. किणीकर सर याचा जन्म सांगली जिल्हयातील भिलवडी या गावी 15 जुलै 1938 मध्ये झाला. घरची परिस्थती अत्यंत हलाखीची होती. अशा परिस्थितीत त्यांनी भिलवडी मध्येच अकरावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले व नंतर सांगलीमधील विलींग्डन कॉलेजमध्ये बी एस्सी पर्यंतचे शिक्षण नाईटस्कुल मध्ये नोकरी करीत पूर्ण केले व बीएड ही पुर्ण केले त्यांच्या शैक्षणिक अद्यापनाची सुरुवात त्यानी सुरुर कवठे ता. वाई येथे केली. गणित या विषयात सरांचा हातखंडा होता त्यामूळे लवकरच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. त्याबदरम्यान त्याचा विवाह सौ. शालीनी किणीकर यांचेशी 1963 मध्ये झाला. सुरुर नंतर ते स्वामी विवेकानंद संस्थेच्या मल्हारपेठ येथील विद्यालयात रुजू झाले. विद्यालयाच्या इमारत उभारणीकामी त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. कराड येथील संत तुकाराम हायस्कूल, कमला नेहरु डी.एड्. कॉलेज येथेही अद्यापनाचे कार्य केले नंतर शिवाजी हायस्कूल कराड, मसूर येथेही शिक्षक पदावर नोकरी केली.
परंतु अद्यापनाचे कार्य करीत असतानाच त्यांच्यातील शिक्षणाचे कार्य वाढविणेचा व लोकांना उद्योग / नोकरी मिळतील असे कार्य करणेचा स्वभाव त्याना स्वस्थ बसू देत नव्हता या प्रेरणेतूनच त्यांनी यशवंत विद्यापीठ कराड या संस्थेची 1965 साली स्थापना केली सुरुवातीला संस्थेमार्फत गणित, इंग्रजी या विषयाव्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले, महिलांसाठी शिवणक्लास वर्ग, बालवाडया सुरु केल्या, अनुदान तत्वावर गायी म्हैस खरेदी, डेअरी केंद्रे, छोटे मोठे तांत्रिक व्होकेशनल कोर्सेस सुरु केले. 1983 मध्ये तत्कालीन खासदार श्रीमती प्रेमलाताई चव्हाण (काकीसाहेब) यांच्या सहकार्याने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडची स्थापना केली. सुरुवातीला जी.डी.आर्च, सिव्हील, इलेक्ट्रीकल, आर्किटेक्चर हे डिप्लोमा कोर्सेस सुरु केले. आज या तंत्रनिकेतनमध्ये 5 डिप्लोमा कोर्सेस सुरु आहेत व आजअखेर हजारो इंजिनिअर या तंत्रनिकेतनमधून तयार झाले आहेत. 1986 मध्ये इंदिरा कन्याप्रशाला मसूर व इंदिरा डी.एड्. कॉलेज मसूर ही मुलींसाठी शिक्षणाची कवाडे त्यांनी सुरु केली. इंदिरा डी.एड्. कॉलेज मसूर चे प्राचार्य म्हणूनही त्यांनी अद्यापनाचे कार्य केले. 1988 मध्ये भिकोबा पाटील हायस्कूल चिखली ही माध्यमिक शाळा सुरु केली. 1992 मध्ये श्रीमती प्रेमलाताई चव्हाण टेक्नीकल इन्स्टीट्यूट सुरु केले. व्यवसाय शिक्षण मंडळ मुंबई मार्फत ड्राप्समन आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन हे कोर्सेस सुरु केले.
1992 मध्ये महिलासाठी त्यांनी प्रियदर्शिनी शिक्षण संस्था कराडची स्थापना केली व महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड माध्यमाच्या अंगणवाडी कोर्सेसची केंद्रे त्यांनी या संस्थेमार्फत सुरु केली. 1998 मध्ये भारत सरकार च्या मानव संसाधन विकास मंत्रालय न्यु दिल्लीच्या NIOS चे अॅफीलेशन घेतले व थेट दहावी व थेट बारावी, तसेच ओबीई ही केंद्रे सुरु केली ज्याचा लाभ आजअखेर विद्यार्थी घेत आहेत. त्यानंतर त्यानी रायगड जिल्हयामध्येही 2 माध्यमिक शाळा यापैकी वरवणे ता.पेण व धामणसई ता.रोहा येथे डोंगरी अदिवासी भागामध्ये प्रसंगी पायी चालत जावून, कष्ट घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरु केल्या. 2003 मध्ये इंदिरा ज्युनिअर कॉलेज मसूर (आर्टस) ही शाखा सुरु केली.
2003 मध्येच उद्योगक्षेत्रातील व शिक्षणक्षेत्रातील बदलते वारे लक्षात घेवून त्यांनी प्रियदर्शिनी शिक्षण संस्था कराडमध्ये टिळम महाराष्ट्र विद्यापीठाची संलग्नता घेवून बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए हे कोर्सेस सुरु केले व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नता घेवून बीबीए व बीसीए या कोर्सेसचे महाविद्यालय सुरु केले. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची 4 स्टडी सेंटर सुरु केली. याव्दारे हजारो विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला व आपले करिअर उज्वल केले. 2013 मध्ये सातारा जिल्हयातील पहिले आर्किटेक्चर महाविद्यालय कौन्सील ऑफ आर्किटेक्चर न्यु दिल्ली व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची मान्यता घेवून सुरु केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष श्री. शिरीष किणीकर दादा व स्नुषा सौ. पुष्पा किणीकर यांचे सहकार्याने संस्थेचा विशाल वटवृक्ष झालेला आहे. आज संस्थेच्या 5 ही शाखा अनुदानित आहेत व ग्रामीण भागाती विद्यार्थ्यांना या शाखांचा लाभ मिळत आहे. अनेकांच्या हाताला काम देण्याचे कार्य श्री. बी.टी.किणीकर सर यांनी केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेवून विविध नामवंत संस्थामार्फत व कर्नाटक व महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सन्मानीत केले आहे. यामध्ये दक्षिण भारत जैन सभा सांगली यांचेमार्फत शिक्षणक्षेत्रातील कर्मयोगी या पुरस्काराने गौरविलेले आहे. तसेच केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय संचिलत नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कुलींग तर्फे आदर्श केंद्र व्यवस्थापन म्हणून सन्मानीत करणेत आले आहे. तसेच इंटरनॅशनल इन्स्टीटयू ऑफ एज्युकेशन दिल्ली यांचेकडून ज्वेल ऑफ इंडिया 2002, लाईफ टाईम अचिव्हमेंट 2001, ग्लोबल इकॉनॉमिक कौन्सील कडून प्राईड ऑफ इंडिया 2004, सिटीझन इंडिग्रेशन पीस सोसायटी कडून भारत ज्योती अॅवार्ड इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करणेत आले आहे. अशा या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय व्यक्तीमत्वाला दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांच्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडत राहो व त्यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत विद्यापीठ कराड या संस्थेचे कार्य सतत वाढत रहावे हीच याप्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो व त्यांना वाढदिवसाच्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा…
प्रा.बी.एम.जाधव,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण तंत्रनिकेतन,
कराड.