छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना महायुतीचे पाठबळ; स्टेडियमचा होणार कायापालट
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना महायुतीचे पाठबळ; स्टेडियमचा होणार कायापालट
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे ना. फडणवीस यांनी डॉ. अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत, कराड येथील स्टेडियमच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाच्यावतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
कराडमधील स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांची मुंबईत भेट घेत, त्यांचे कराडकरांच्यावतीने आभार मानले. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, क्रिडाप्रेमींना सर्वसोयींनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होत आहे.
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शहराची शान आहे. याठिकाणी रणजी क्रिकेट सामनेही खेळले गेले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टेडियमची दुरावस्था झाल्याने स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत होती. जानेवारी महिन्यात कराड येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आले असता; डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावेळी ना. फडणवीस यांनीही लवकरच स्टेडियमचा विकास आराखडा तयार करुन, निधी देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली होती.
त्यानुसार डॉ. भोसले यांनी तातडीने पावले उचलत, विकास आराखडा तयार करण्यासाठी कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेत तयार केलेला स्टेडियमचा विकास आराखडा, फेब्रुवारीमध्ये ना. फडणवीस यांना सादर केला. सर्व प्रकारच्या खेळांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अंतर्भाव या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. गेले जवळपास ६ महिने या निधीसाठी डॉ. भोसले शासन पातळीवर पाठपुरावा करत होते.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी प्रथमच एवढा भरघोस निधी प्राप्त झाल्याबद्दल, कराडमधील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच या निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल क्रीडाप्रेमींमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.