जीवनशैलीव्यवसाय

कृष्णा सहकारी बँकेच्या मोबाईल बँकींग सेवेला प्रारंभ पैशांच्या हस्तांतरणासह अन्य सुविधा आता एका ‘क्लिक’वर; ग्राहक – सेवक मेळावा उत्साहात

कृष्णा सहकारी बँकेच्या मोबाईल बँकींग सेवेला प्रारंभ
पैशांच्या हस्तांतरणासह अन्य सुविधा आता एका ‘क्लिक’वर; ग्राहक – सेवक मेळावा उत्साहात
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कृष्णा सहकारी बँकेच्या मोबाईल बँकींग सेवेला प्रारंभ झाला आहे. यासाठी बँकेने खास मोबाईल ॲप्लिकेशन बनविले असून, या सेवेमुळे मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर कृष्णा बँकेत अथवा इतर बँकांमध्ये पैशांच्या तत्काळ हस्तांतरणासह अन्य सर्व बँकींग सुविधा एका ‘क्लिक’वर उपलब्ध झाल्या आहेत. कृष्णा आर्थिक परिवारातील संस्थांच्या ग्राहक – सेवक मेळाव्यात य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोबाईल बँकींग सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
नारायणवाडी (ता. कराड) येथील हॉटेल लक्ष्मी इलाईटच्या सभागृहात कृष्णा आर्थिक परिवारातील संस्थांच्या ग्राहक व सेवकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, बबनराव शिंदे, सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती अलका जाधव, बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आप्पांनी कृष्णा परिवारातील सर्व संस्था उभ्या केल्या. आप्पांचे परिसराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच या सर्व संस्था कार्यरत आहेत. कृष्णा बँकेमार्फत आजही ८० टक्के कर्जाचे वितरण हे शेतकऱ्यांनाच केले जाते, ही फार मोठी गोष्ट आहे. आप्पांनी घालून दिलेल्या पायवाटेवरुन चालतानाच ग्राहकांच्या सेवेसाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा कृष्णा बँकेचा प्रयत्न स्तुत्य आहे. ग्राहकांच्या पाठबळामुळे आणि सेवकांच्या प्रयत्नामुळे कृष्णा आर्थिक परिवारातील सर्वच संस्था उंचीवर पोहचल्या आहेत.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, या भागातील लोकांना बचतीची सवय लागावी, लोकांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आप्पांनी ५३ वर्षांपूर्वी कृष्णा बँकेची स्थापना केली. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात, आज आपण मजबूत अशी आर्थिक संस्था उभी केली आहे. डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली बँक टिकविण्याचे महत्वाचे काम झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा, तसेच कृष्णा परिवारातील सर्व आर्थिक संस्थांचा विस्तार केला जात आहे. या माध्यमातून अनेक शेतकरी, उद्योजक, सेवकांसह सर्वसामान्य नागरिकांना अर्थसहाय्य केले जात आहे. बँकेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, मोबाईल बँकींग सेवेला प्रारंभ केला आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळे व कर्मचाऱ्यांच्या योगदानातून बँकेची उत्तुंग प्रगती शक्य झाली आहे.
यावेळी व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या बँकेच्या शाखांना आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच बँकेच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत प्रकाश पाटील, मनोज पाटील, नवनाथ पाटील, सौ. मोनिका जाधव, दत्तात्रय पाटील या ग्राहकांनी व्यक्त केले. तसेच बँकेच्या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दामाजी मोरे यांनी स्वागत केले. भगवान जाधव यांनी प्रास्तविक केले. बँकेचे व्यवस्थापक किरण पाटील व पोपट देसाई यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी जाधव यांनी आभार मानले.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, गिरीश शहा, श्रीमती सरिता निकम, व्यवस्थापन मंडळ सदस्य दिलीपराव पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, ॲड. विजय पाटील, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन धनाजी जाधव, कृष्णा महिला पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. राजश्री थोरात, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मलकापूर माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक राजू मुल्ला, उद्योजक आर. टी. स्वामी, माजी जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके यांच्यासह सर्व संस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »