सरसकट रूग्णांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार द्या
मनोज माळी; ‘प्रहार’च्या आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन, शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट यादीतील आजारांच्या रूग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. तसेच याव्यतिरिक्त असलेल्या रूग्णांनाही पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मुंबई येथे त्यांच्या ‘लोहगड’ या निवासस्थानी निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानूदास डाईंगडे, बंटी मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सदरच्या प्रश्नांबाबत शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दिड लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत. तर केंद्र शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रूपयापर्यंतचे मोफत उपचार देण्यात येत आहेत.
सदरच्या योजनेंतर्गत जवळपास 1365 आजारांवर उपचार करण्यात येतात. मात्र, योजना लागू असलेल्या रूग्णालयात रूग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याला तात्काळ योजनेचा लाभ मिळत नाही. त्या रूग्णाला तपासण्या व योजनेत सहभागी होईपर्यंत स्व:खर्चाने उपचार घ्यावे लागत आहेत. यात रूग्णांचे लाखो रुपयांचे बिल होत आहे. तसेच योजनेत समाविष्ट नेसलेल्या आजारांवर उपचार घेताना संबंधित रूग्णाला प्रसंगी शेती व घर विकावे लागत आहे. त्यामुळे शासकीय योजना लागू असलेल्या रूग्णालयात दाखल होणाऱ्या सरसकट आजारांच्या रूग्णांवर पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी या प्रश्नांबाबत शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.