जीवनशैली

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का; कराड दक्षिणेत भाजपला बळकटी

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का; कराड दक्षिणेत भाजपला बळकटी
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
मलकापूरसह कराड दक्षिणच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडल्याने येथील स्थानिक राजकीय समीकरण बदलले आहे. मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने याठिकाणी कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून यामुळे मलकापूर नगरपालिकेसह कराड दक्षिणेत भाजपला चांगलीच बळकटी मिळाली आहे.
मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह त्यांचे समर्थक मलकापूरच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. गीतांजली शहाजी पाटील, नगरसेविका सौ. स्वाती तुपे व माजी नगरसेविका सौ. अनिता राजेंद्र यादव आणि मलकापूरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येथे बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले, रवींद्र अनासपुरे, चित्रलेखा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
तसेच पक्षप्रवेशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचीही सागर निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून, पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांना विधानसभेत निवडून देण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

पक्षप्रवेशावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारताचे सलग तिसऱ्यांचा पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आपण सर्वांनी आज पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांचे पक्षात स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन आणि खोटारडेपणा करून मतदान मिळविले. नरेंद्र मोदी संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून मते मिळविली. पण या खोटेपणाला आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खोटारडेपणाला कंटाळून आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, याचा अभिमान आहे.
ते म्हणाले, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारखा संयमी, विकसित मतदारसंघासाठी समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता, तसेच सर्वांना परिवार समजून वागवणारा नेता आपल्यासोबत आहे. अतुलबाबांचा विधानसभेत विजय निश्चित असून, मोदीजींच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, मलकापूरचे माजी नगरसेवक राजू मुल्ला, माजी सरपंच सुहास कदम, अधिकराव पाटील, नीलकंठ शेडगे, सखाराम काटेकर, संजय तोडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुलबाबा भोसले यांनी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 616 मतांचे लीड मिळवून देत, दक्षिणेत भाजपची ताकत दाखवून दिली होती. काँग्रेसच्या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पृथ्वीराज चव्हाण गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता त्यांचे मलकापुरातील महत्वाचे शिलेदार बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने कराड दक्षिणेत काँग्रेसला खिंडार पडले आहे.
राजेंद्र यादव यांच्या घरातील सदस्य गेली 23 वर्षे मलकापूर नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. ते स्वतः तीन टर्म निवडून आले असून, गेली दहा वर्षे बांधकाम सभापती म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या पत्नी सौ. अनिता पाटील या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांचे बंधू अरुण यादव हेदेखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मोठा जनसंपर्क आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आता भाजपची कास धरल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »