जीवनशैलीव्यवसाय

विलासकाकांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित आयुष्य वेचले आ.पृथ्वीराज चव्हाण; बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन, शेतकरी सल्ला केंद्र उभारावे

विलासकाकांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित आयुष्य वेचले
आ.पृथ्वीराज चव्हाण; बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन,शेतकरी सल्ला केंद्र उभारावे
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
विलासकाकांनी आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेचले. काकांचे तेच काम उदयसिंह पाटील जिद्दीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. विलासकाकांचे शेतकऱ्यांना समर्पित आयुष्य होते. त्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर प्रवेशद्वार कमानीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. श्रीनिवास पाटील होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, अजितराव पाटील-चिखलीकर, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, सर्व संचालक उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, बाजार समितीने काकांच्या नावाने उभारलेल्या कमानीत प्रवेश केल्यानंतर काकांच्या दृष्टीची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेले काम, शेतकऱ्यांचा राखलेला सन्मान, अधिकार व पिळवणूक होवू नये, यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या नजरेसमोर शेतकरी वर्ग होता व तोच त्यांचा केंद्रबिंदू होता. याचे कायम स्मरण ठेवूया.
श्रीनिवास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना सल्ला देणारे केंद्र बाजार समितीने उभे करावे. आधुनिक कोल्ड स्टोरेज हाऊस उभारावे. शेतकऱ्यांच्या हातात माल असताना त्यांना जास्त पैसे कसे मिळतील, याचा प्रयत्न झाल्यास नक्कीच काकांचे कार्य आपण पुढे नेत आहोत, याची प्रचिती येईल.
अॅड.उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी नवनवीन संकल्पना राबवत बाजार समितीला राज्यात लौकिक मिळवून दिला. कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने कृषी प्रदर्शन सुरू केले. अनेक अडचणीतून मार्ग काढत बाजार समिती सुस्थितीत आहे. काकांनी घालून दिलेल्या पायावर संस्था कायदा व व्यवहाराची सांगड घालून चालवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या बंधनात राहून आपल्याला काम करावे लागणार आहे. भविष्यात पुरोगामी विचारसरणी टिकावी, यासाठी विलासकाकांच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नावर आपल्याला चालणे गरजेचे आहे. येथून पुढे विलासकाकांची विचारसरणी व त्यांनी बांधलेल्या संघटनेबरोबर सर्वांनी रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात विजयकुमार कदम यांनी सर्व संचालक, व्यापारी व सेवकांच्या सहकार्यातून गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीला 457 कोटींची उच्चांकी उलाढाल करता आली. आमच्या संचालक मंडळास बाजार समितीच्या प्रवेशद्वारास विलासकाकांचे नाव देण्याचा पहिला मान आम्हाला मिळाला, याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी माजी कृषी अधिकारी श्री. पटेल, प्रा.धनाजी काटकर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव, संचालक प्रकाश पाटील यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »