जीवनशैली

कराड पालिकेची प्रशासकीय राजवट इंग्रजांप्रमाणे लुटारू राजेंद्रसिंह यादव यांचा आरोप; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी, अन्यथा आज टाळे ठोको आंदोलन

कराड पालिकेची प्रशासकीय राजवट इंग्रजांप्रमाणे लुटारू
राजेंद्रसिंह यादव यांचा आरोप; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी, अन्यथा आज टाळे ठोको आंदोलन
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सव्वादोन वर्षांपूर्वी येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदांचा कार्यकाल संपल्यापासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. तेव्हापासून पालिकेत भोंगळ कारभार सुरू आहे. पालिकेत बोगस कामे दाखवून निधी पळवण्याचे काम काही मुजोर अधिकार्‍यांकडून सुरू आहे. त्यामुळे पालिकेची प्रशासक राजवट इंग्रजांच्या राजवटीप्रमाणे लुटारू असल्याचा आरोप यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला.
यशवंत विकास आघाडीतर्फे पालिकेतील भ्रष्ट कारभाराबाबतची माहिती देण्यासाठी
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, प्रियांका यादव, सौ. देसाई, सुधीर एकांडे, किरण पाटील, निशांत ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले आदी. उपस्थित होते.
श्री. यादव म्हणाले, नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. माहितीचा अधिकार वापरून कागदपत्रे मिळवणाऱ्यांशी संधान बांधून संबंधितांच्या मागे लागणाऱ्यांची चैन तयार झाली आहे. या रॅकेटमध्ये नगररचना कार्यालयातील पाच अधिकारी सहभागी आहेत. त्यांची बुधवार, दि. 29 रोजी पाच वाजेपर्यंत तात्काळ बदली करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे करत यावर कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेला टाळे ठोकू. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
ते म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणात देशपतळीवर प्रथम येणाऱ्या पालिकेचा स्तर आता विभागीय स्तरापर्यंत घसरला आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनात तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे आल्यापासून विस्कळीतपणा सुरू झाला आहे. सध्याच्या प्रशासक राजवटीमध्ये बोगस कामे दाखवून निधीची पळवापळवी सुरू आहे. यामध्ये शिक्षकांच्या दहा टक्के पगारही पळवण्यात आला आहे. तसेच ‘पाच लाखाचे काम आणि 25 लाखांचे इस्टिमेट’ असले प्रकार सुरू असून पालिकेचा कारभार हा भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. एकच काम दोन-दोनवेळा दाखवून पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे. बोगस इस्टिममेंट व बिले दाखवून बेकायदेशीरपणे पालिकेचे पैसे वापरले जात आहेत. त्यामुळे ही पालिका आहे की धर्मशाळा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या प्रशासक राजवटीमध्ये पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा पालिकेचे वीज कनेक्शन तोडल्याची लाजिरवाणी घटना घडली. यामागे नक्कीच कोणीतरी बोलवता धनी आहे? अशी शंकाही उपस्थित केली. तसेच पालिकेकडे निधी नसताना एफडी पावत्या असूनही वीज बील का भरले नाही? असाही प्रश्न उपस्थित करून पालिकेच्या सर्वच विभागांची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच पालिकेच्या सर्व नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »