कृष्णा हॉस्पिटलमध्ये जागतिक नर्सेस दिन उत्साहात साजरा
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये जागतिक नर्सेस दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत असणारे परशुराम नायकवडी यांना सर्वोत्कृष्ट नर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शशनर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया कराड शाखेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी चिफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट नर्सिंग सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परशुराम नायकवडी यांना बेस्ट नर्स ॲवॉर्डने, तर महेश वेल्हाळ व शुभम कार्वेकर यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. तसेच पोस्टर स्पर्धेतील यशाबद्दल वृषाली डुबल, अबोली डिसले, सौ. श्रीदेवी, महेश पाटील व सौ. जयश्री थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, नर्सिंग सुपरिडेंट शोभा पाटील, नीलम सावंत यांच्यासह नर्सिंग कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.