शॉर्टकटचा मार्ग अत्यंत घातक आहे:भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर
कृष्णा विश्व विद्यापीठाचा १२ व्या दीक्षांत सोहळा संपन्न:अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सध्याच्या स्पर्धेच्या युगात झटपट यशासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबितात. पण हा मार्ग अत्यंत घातक आहे. स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करा. जे काम कराल, त्यात सर्वोच्च योगदान द्या. देशाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून, तुमच्या सर्वांच्या अमूल्य योगदानामुळे देश निश्चितच उत्तुंग स्थानावर पोहचेल, असा विश्वास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.
कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅकडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील १०४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १५ विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. गंगाखेडकर पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे जीवन तुमच्या हातात आहे. यशसिद्धीसाठी मोठी स्वप्ने पहा. तसेच स्वप्नपूर्तीसाठी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून अपार कष्टाची तयारी ठेवा. जीवनात पैसा महत्वाचा नाही, तर जे काम कराल त्या कामाचे समाधान महत्वाचे आहे. विद्यापीठाला आणि देशाला अभिमान वाटेल असे काम तुमच्याकडून घडावे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विश्व विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन, नवनिर्मितीला चालना देणारे ज्ञानकेंद्र आहे. कृष्णा विश्व विद्यापीठ आजच्या घडीला एकूण १३८ अभ्यासक्रम चालवते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि सुविधांसह सज्ज असलेली जागतिक दर्जाची न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट विकसित केली जात आहे. तसेच पुढील वर्षापासून २०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले जाणार असून, याठिकाणी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक ऑपरेशन थिएटरसह अन्य सुविधांचा समावेश असणार आहे. आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यात कृष्णा विश्व विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले असून, ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या कर्करोग तपासणी व उपचारासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, सौ. गौरवी भोसले, शिवाजीराव थोरात, कृष्णा वैद्यकीय विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. एन. आर. जाधव, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, डॉ. स्वप्नाली शेडगे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.