कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा उत्साहात
५१०० कोटींच्या व्यवसायपूर्ती निमित्त आयोजन; बँकेच्या सेवक वेतन कराराचे नुतनीकरण
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
दि कराड अर्बन को-ऑप.बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा दि.२८ रोजी कराड येथील हॉटेल वीटस् सत्यजित या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेने सन २०२३-२४ मध्ये केलेल्या ५१०० कोटींची व्यवसायपूर्ती आणि नेट एन.पी.ए. शून्य टक्के या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने सदर संचालक-सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, माजी ज्येष्ठ संचालक प्रा. विद्याधर गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेच्या सेवकांच्या हस्ते ५१०० कोटींचा उल्लेख असलेला केक कापण्यात आला.
बँकेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्बन बझार व डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांचा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेच्या सन २०२४-२०२९ या कालावधीसाठीच्या सेवक वेतन कराराचे प्रकाशन बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, माजी ज्येष्ठ संचालक प्रा. विद्याधर गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, सर्व महाव्यवस्थापक, सेवक संघाचे अध्यक्ष सुहास पवार व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी उपस्थित सेवकांना मार्गदर्शन करत असताना यश मिळवणे सोपे असते, पण त्यात सातत्य ठेवणे अवघड असते. बँकेने मार्च २०२४ मध्ये साध्य केलेले नेट एन.पी.ए.चे ध्येय पुढील काळात देखील टिकवून ठेवले पाहिजे आणि यासाठी आपण सर्व सेवक यापुढील काळात देखील सातत्याने आणि एकजुटीने प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त केला.
बँकेचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. द. शि. एरम व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी ५००० कोटी रुपयांची व्यवसायपूर्ती व नेट एन.पी.ए. शून्य टक्के करण्याचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. यामुळे बँकेच्या सभासदांचा बँकेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. यापुढेही बँकेच्या व्यवसायवाढीसाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सेवकांना केले. तसेच सेवक करारानिमित्ताने सर्व सेवकांना देण्यात आलेल्या वाढीची माहिती देताना लिपीक व चतुर्थ श्रेणीतील सेवकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी संचालक मंडळाने बँकेच्या सेवकांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि त्यापूर्णत्वास नेण्यासाठी आखलेले धोरण याचा पूर्ण लेखा-जोखा सेवकांसमोर मांडला. बँकेची सध्याची असणारी अर्थिक स्थिती व प्रगतीचा वेग हा सेवकांचा प्रामाणिकपणा आणि कामातील योगदान यामुळेच असून बँकेचे संचालक मंडळ नेहमीच सेवकांना सहकार्य करत राहील असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सेवकांना दिला.
बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी सेवकांना मार्गदर्शन करताना, भविष्यात बँकेने फक्त आकडेमोडीवर लक्ष न देता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसायवाढीसाठी नियोजन करावे. याचबरोबर दीर्घकालीन व्यवसायाचे धोरण राबविण्याची सूचना करत बँकेने केलेल्या ५१०० कोटींच्या व्यवसायपूर्तीसाठी सर्व सेवकांचे अभिनंदन करत भविष्यकालीन वाटचालीसाठी बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.
ट्रेझरी विभागाचे महाव्यवस्थापक सलीम शेख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या नोकरी कालावधीतील योगदान व अनुभव सांगितले. तर प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक दीपक आफळे यांनी सेवक कराराच्या अनुषंगाने माहिती दिली आणि सीए. धनंजय शिंगटे यांनी बँकेच्या पुढील पाच वर्षांसाठीचे पथदर्शी धोरण सादर केले.
बँकेचे महाव्यवस्थापक दीपक आफळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्नेहांकिता नलवडे, सहाय्यक महाव्यवस्थापक सुहास पवार यांनी आभार मानले. यावेळी अर्बन बझार व डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव, सौ. रोहिणी चिन्मय एरम, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व सेवक उपस्थित होते.