जीवनशैलीमहाराष्ट्रराज्य

साताऱ्यात याआधीही भगवा फडकत होता आणि आताही भगवाच फडकेल:पंतप्रधान नरेंद्र मोदी

साताऱ्यात याआधीही भगवा फडकत होता आणि आताही भगवाच फडकेल:पंतप्रधान नरेंद्र मोदी
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शौर्यभूमी आहे. ही भूमी कोणत्याही देशभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. येथील मिलिटरी अपशिंगे गावातील जवान शिवरायांच्या आदर्शांनुसार करत असलेली देशसेवा गौरवाची बाब आहे. याठिकाणी शिवरायांचेच वारसदार छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे साताऱ्यात याआधीही भगवा फडकत होता आणि आताही भगवाच फडकेल, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेला संबोधित करताना ते बोलत होते. प्रारंभी, मोदींनी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रभू श्रीरामांची चांदीची मूर्ती भेट देवून आणि फेटा बांधून मोदींचे स्वागत केले. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, सामाजिक न्यायमंत्री रामदार आठवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, आ. महेश शिंदे, माजी आ. आनंदराव पाटील, मनोज घोरपडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपने 2013 मध्ये मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर प्रथम मी रायगडावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ध्यान केल्यानंतर मला जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली, त्या पवित्र मातीने दिलेल्या आशीर्वादावर गेली 10 वर्षे मी तुमच्यासाठी जगण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसने सैनिकांच्या कुटुंबियांना वन रँक वन पेन्शनपासून 40 वर्षे वंचित ठेवले. त्यांनी यासाठी 500 कोटींचे गजर दाखवले. मात्र, भाजपने आज त्यांना वन रँक वन पेन्शन मिळवून देत त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद केली आहे. भारतीय सेनेकडे आज स्वदेशी बनावटीची शस्त्रे आहेत. देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. परंतु, काँग्रेसने जनतेत गुलामगिरीची मानसिकता पसरवली. सर्व जग शिवरायांच्या युद्धनीतीचा अवलंबली. त्यांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता. मात्र, एवढी वर्षे भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे चिन्ह होते. ते हटवत त्याजागी भाजपने शिवरायांच्या प्रतिमेला स्थान दिले. ऐतिहासिक लोहगड, सिंधुदुर्ग, जिंजी सारख्या शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकन दिले. तब्बल 60-70 वर्षे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू होत नव्हते. मात्र, भाजपने 370 कलम हटवून त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू केले.
ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास मनाई केली आहे. पण कॉंग्रेसने आरक्षणाच्या नावावर लोकांना झुलवत ठेवण्याचे काम केले. काँग्रेसने ओबोसींच्या आरक्षणावर दरोडा टाकून रातोरात कर्नाटकातील सर्व मुस्लिमांना ओबीसी घोषित करून आरक्षण दिले. मग जम्मू काश्मीरमधील दलित, आदिवाशींना आरक्षणापासून का वंचित ठेवले. आता संविधान बदलून काँग्रेसला हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करायचा आहे. मात्र, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू शकणार नाही किंवा संविधान बदलू शकणार नाही, हे काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनी लक्षात ठेवावे.
शासकीय कोठारातील धान्य सडून गेले तरीही कॉंग्रेसने जनतेला मोफत धान्य दिले नाही. न्यायालयाचा आदेशही धुडकावून लावला. याउलट मोडी सरकारने 80 लाख जनतेला मोफत धान्य दिले. कॉंग्रेसने आरोग्य सेवांकडेही मोठे दुर्लक्ष केले. मात्र, मोडी सरकारने सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरवली. मेडिकल कॉलेज उभारले. प्रत्येक वर्षी एक लाख एमबीबीएस डॉक्टर्स पदवी घेवून बाहेर पडत आहेत. आज आयुष्मान आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात आरोग्य सेवांचा विस्तार होत आहे. काँग्रेस सरकारची गरिबांप्रती काय वृत्ती होती, याचा अंदाज त्यांच्या धोरणांवरून येऊ शकतो. जमिनी, पैसे आणि दागिन्यांसह घराघरातील संपत्ती लुटण्याचा कॉंग्रेसचा इरादा आहे. मात्र, मोदी सरकारने महिलांच्या नावे घरे दिली. कित्येक महिलांना लखपती केले. विविध योजनांचा लाभ दिला. त्यामुळे जनताही भाजपच्याच पाठीशी राहून आपल्या मतांचा कौल देईल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना लोकसहभाग असला पाहिजे, अशी भूमिका घेतली. यातूनच लोकशाहीचा उदय झाला. गेल्या दहा वर्षांत शिवरायांच्या विचार आणि संकल्प वास्तवात उतरवण्याचे काम मोदींनी केले आहे. आज भाजप हा दोन खासदारांचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. हे परिवर्तन मोदींमुळे झाले. शेतकरी, जनतेच्या कल्याणासाठी यापूर्वी फक्त घोषणा झाल्या. मात्र, त्या सत्यात उतरवण्याचे कामही मोदींनी केले आहे. विरोधकांनी आत्तापर्यंत सत्तेसाठी मतांचा जोगवा मागितला. मात्र सर्वसामान्यांसाठी काहीही केले नाही. काँग्रेसला मोठा अहंकार होता. लोककल्याणाचा विचार करून भाजपने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. आज कृष्णा नदी स्वच्छ करण्याचा संकल्प, पर्यटन, इंडस्ट्री आणि आयटी पार्क उभारणी आपण करणार आहोत. आज भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप केला जात आहे. मात्र, संविधान बदलण्याची गरज नाही. संवर्धन संपवण्याचे काम त्याकाळी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून केले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, अजित कदम, अशोकराव गायकवाड, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींनी मनोगत व्यक्त केले. या महासभेला कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्हाभरातून, तसेच लगतच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »