“पाणी नाय तर “मतदान” नाय !! प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरुद्ध गुंडेवाडी ग्रामस्थांचा एल्गार

“पाणी नाय तर “मतदान” नाय !! प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरुद्ध गुंडेवाडी ग्रामस्थांचा एल्गार
वाई:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
वाई पंचायत समिती,सातारा जिल्हा परिषद व महसूल प्रशासन अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने प्रशासकीय मंजुरी असतानाही वाई तालुक्यामधील गुंडेवाडी गावची जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खुदाईला मुहूर्त सापडेना, गेली दोन वर्षांपासून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गुंडेवाडी गावाचे पिण्याच्या पाण्याचे हाल संपेनात पिढ्यानपिढ्या टंचाईग्रस्त गुंडेवाडी गावाच्या मूलभूत प्रश्नाकडे सर्व प्रशासन अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गुंडेवाडी ग्रामस्थांनी चेष्टा करत आहे. कुंभकर्ण प्रशासनाच्या कारभारा विरुद्ध गुंडेवाडी ग्रामस्थांनी पाणी नाय तर मतदान नाय असा एल्गार पुकारत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या कटू निर्णय घेतला आहे. मांढरदेव व पांडवगडाच्या पायथ्या लगत वसलेले गुंडेवाडी गाव वर्षातील सहा महिने टँकरच्या पाण्यावर अवलंबून असते याचीअधिकृत कल्पना वाई पंचायत समिती प्रशासनाला आहे तरीही गुंडेवाडी गावाला टॅंकरमुक्त करण्यात पूर्ण पणे अपयश आले आहे.
गुंडेवाडी गाव टॅंकरमुक्त करण्यासाठी सन २०२१/२२ मध्ये गावाला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३६ लाख ४० हजार ९०५ रुपयेची जिल्हा परिषद मार्फत पाणी व स्वच्छता समितीने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. १५नोव्हेंबर २०२२ ला ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले त्यानुसार पाईपलाईनचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे विहीर खुदाई साठी गुंडेवाडी ग्रामपंचायत मालकीची जागा निव्वळ धावडी पाझर तलावा शेजारी असल्याने प्रशासनाचे घोडे पाझर तलावात विनाकारण डुबक्या मारत आहे त्यामुळेच गुंडेवाडी गावची मंजूर विहीर खोदण्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे का अडकवली आहे याचे उत्तर गुंडेवाडी ग्रामस्थांना मिळत नाही. विहीर खुदाई साठी सर्व स्तरावरील प्रशासकीय आदेश असताना जबाबदारी न घेता सर्वच प्रशासकीय अधिकारी गुंडेवाडी ग्रामस्थांना टोलवाटोलवी करून आपल्या कर्तव्यात हेतुपुरस्क र टाळाटाळ करत असल्याने योजनेचे काम गेल्या १० महिन्यापासून बंद आहे त्यामुळे योजना मंजूर असूनही ग्रामस्थांना सद्यस्थितीत पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत याला जबाबदार कोण असा प्रश्न गुंडेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारत आहे. वाई प्रांताधिकारी, ग्रामीण पुरवठा अभियंता सातारा व वाई व अन्य तांत्रिक विभाग अधिकाऱ्यांनी गुंडेवाडीची प्रस्तावित मजूर विहिरीमुळे धावडी गावचे पाण्यावर तसेच पाझर तलावातील जलस्रोतावर कुठल्याही प्रकारे फरक किंवा परिणाम होणार नाही तसेच धावडी गावचा विहीर खुदाईला असणारा विरोध हा पूर्णपणे चुकीचा असल्याचे लेखी पत्र संबंधित विभागाला दिले आहे याची गांभीर्याने दखल वाई पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाने घेतल्यास गुंडेवाडी गाव कायमस्वरूपी टॅंकर मुक्त गाव होणार आहे याबाबत गुंडेवाडी सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थांनी सर्वच प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांना जाग येत नाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता सातारा व वाई ,वाई पंचायत समिती गटविकास अधिकारी गुंडेवाडी ग्रामस्थांच्या मागणीला कसलाही प्रतिसाद देत नाही याच नैराश्यातुन”पाणी नाय तर “मतदान” नाय असे म्हणत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदाना वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.