कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाईची यात्रा उत्साहात
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाईची यात्रा उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराडनगरीची ग्रामदैवता श्री कृष्णाबाईची चैत्री यात्रा आज शनिवारी उत्साहात साजरी झाली. मंदिर परिसर विद्युत रोषणाई व फुलांनी सजवला होता. तर, सुवर्ण अलंकार आणि भरजरी साडीतील कृष्णाबाईचे देखणे रूप डोळ्यात साठवत भक्तगण नतमस्तक होत होते. यात्रेनिमित्त कराड शहरासह ठिकठिकाणांहून आलेल्या भाविकांनी अवघा कृष्णाघाट परिसर फुलून गेला होता.
कृष्णाबाईच्या सहा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा आजचा मुख्य दिवस होता. महोत्सवात प्रथेप्रमाणे नित्याने पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होत आहेत. कृष्णामाईचे दर्शन घेण्यासाठी आज अगदी सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सालाबादप्रमाणे पुरणपोळ्यांचा नेवैद्य दाखवत व श्रीफळ वाढवत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मंगलमय वातावरणात दर्शन घेतले. दरम्यान, प्रसाद, मिठाईसह खेळणी विक्रीची दालने, खाद्य पदार्थांचे हातगाडे गर्दीने फुलून गेले होते.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज सायंकाळी ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि सालाबादप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना होऊन कृष्णामाई यात्रा महोत्सवाचा शुभारंभ झाला होता.
यानंतर दुसऱ्या दिवशी ‘नवचंडी याग’ संपन्न झाला. तर ‘सुनहरी यादे’, भजन, हळदी कुंकू, पूजाअर्चा असे कार्यक्रम होत राहिले. दररोज महाप्रसादही वाटप होत आहे.
आज रविवारी दि. २८ रोजी सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णाबाई यात्रा महोत्सवाची सांगता होईल.