साताऱ्याला जातीयवाद्यांची दृष्टी लागू देणार नाही : शशिकांत शिंदे
साताऱ्याला जातीयवाद्यांची दृष्टी लागू देणार नाही
शशिकांत शिंदे; जनता महाविकास आघाडीला साथ देईल, उदयनराजेंचे आव्हान मानत नाही
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा असून त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम आपण करणार आहोत. त्यामुळे यशवंत विचारांच्या सातारा जिल्ह्याला जातीवादी पक्षांची दृष्ट लागू देणार नाही, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यांनतर शशिकांत शिंदे यांनी येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, देवराज पाटील यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यांनतर आपण माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यांला अभिवादन करून प्रचारास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याला भविष्याची जान, व्हिजन असलेला आणि जनतेच्या पेक्षा पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. त्यामुळे लोक महाविकास आघाडीला कौल देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजेंच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, माझी लढाई कोणत्या पक्षाशी वा उमेदवाराशी नसून ती तत्वाशी आहे. समोर कोणीही असले तरी आपण त्यांचे आव्हान मनात नाही.
श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले, श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यानंतर मी तो आदेश मान्य केला आहे. मी बारा महिने काम करणारा, जनमानसात मिसळणारा, संपर्क असलेला लोकप्रतिनिधी आहे. काही जण निवडणुकीपुरते बाहेर पडतात की काय? हे मला माहित नाही. परंतु, जनता सुज्ञ असून ती योग्य निर्णय घेईल.
विरोधकांकडून काही प्रकाराने बाहेर काढण्याचे बोलले जात आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, रडीचा डाव खेळू नका. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जा. खोट्या केसेस दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका.अधिकारांचा गैरवापर होत आहे अनेकांना फोडण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, आम्ही या परिणामांना घाबरत नाही. सातारा जिल्ह्याला फोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, विरोधकांना त्यात यश आलेले नाही. काही बाबतीत न्यायालयाला निर्णय घेऊ द्या. सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.
जिल्ह्यातील लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. साताऱ्याने आजपर्यंत महायुतीला साथ दिलेली नाही. जनतेतून महाविकास आघाडीला पसंती असून ते महाविकास आघाडीलाच कौल देतील.