सैनिकांच्या प्रश्नांसाठी लोकसभेच्या रिंगणात प्रशांत कदम; क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातून नवी क्रांती घडवणार
सैनिकांच्या प्रश्नांसाठी लोकसभेच्या रिंगणात
प्रशांत कदम; क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातून नवी क्रांती घडवणार
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
सैनिकांच्या क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात आज सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे सैनिक फेडरेशनचा मेळावा घेवून लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका मंडळी. त्यानुसार आपण आजी-माजी सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभा निवडणुकीला समोरे जात असून क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातून नवी क्रांती घडवणार असल्याचा विश्वास माजी सैनिक प्रशांत कदम यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व विविध सैनिक संघटनांच्या वतीने कराड येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी निवृत्त सुभेदार मेजर, राजकुमार शिंदे, राजाराम माळी, सदाशिव नागणे, चंद्रकांत साठे, विक्रम वरेकर, प्रकाश मसुगडे, मोहन चव्हाण, सचिन माने, सुरज वाघमारे व माजी सैनिक उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, जिल्ह्यात जवळपास 82 हजार आजी-माजी सैनिकांची कुटुंब असून त्यांचे मतदान जवळपास सव्वा तीन लाखांच्या घरात आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सैनिक कुटुंब निर्णायक असतानाही सैनिकांच्या कुटुंबाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व सैनिक संघटना व आजी-माजी सैनिक संघटनांच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सातारा लोकसभेचा खासदार हा माजी सैनिकच असेल, असेही त्यांनी सांगितले.
देशाचे रक्षण करणारा सैनिक हा शेतकरी, शिक्षक, शोषीत व वंचिताचा पुत्र असतो. त्यामुळे सैनिकाला समाजाची जाण असते. आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही, तर ही लढाई सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या हक्कासाठी आहे. जिल्ह्यात आजी-माजी व शहिद सैनिकांच्या कुटुंबांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटलो. मात्र, सैनिकांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही ही भुमिका घेत आहे. भविष्यात सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात व देशभरात सर्व मतदार संघात सैनिकांचे प्रतिनिधी लोकसभा निवडणुक लढवतील, असेही त्यांनी सांगितले.