जीवनशैली

काँग्रेसने सत्ताकाळात उतमात केला खासदार उदयनराजे भोसले; महायुतीला जनतेचा कौल मिळेल, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन

काँग्रेसने सत्ताकाळात उतमात केला
खासदार उदयनराजे भोसले; महायुतीला जनतेचा कौल मिळेल, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अशावेळी काँग्रेसने महत्वकांक्षी कृष्णा खोरे विकास योजना का राबवली नाही? या योजनेची कल्पना आपण गोपीनाथ मुंडे यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी याठिकाणी भाजपचा एकही प्रतिनिधी नसताना त्यांनी हा प्रकल्प उभा केला. आज या माध्यमातून जिल्ह्यात परिवर्तन झाल्याचे दिसते. मात्र, त्यावेळी ‘दगडालाही शेंदूर फासला; तरी लोक आपल्यालाच निवडून देतील’ अशा अविर्भावात असलेल्या काँग्रेसने सत्ताकाळात मोठा उतमात केला. त्यामुळेच पक्षाची मोठी वाताहत झाल्याचे टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड दौऱ्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, राजेंद्रसिंह यादव, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भरत पाटील, तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघनिहाय शिरवळ, खंडाळा, वाई, पाचगणी, महाबळेश्वरपासून भेटीगाठींना सुरुवात केली. त्यानंतर साताऱ्यातील शहरी भागासह कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघातही बैठका घेतल्या. दोन दिवसात कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघाचा दौरा करणार आहे. या निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून मतदार महायुतीलाच कौल देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली. मात्र, नऊ याद्या जाहीर होऊनही त्यामध्ये आपले नाव नाही? याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना उमेदवारी दिल्याचे स्वागतच आहे. मला दिली नाही; यात वाईट वाटण्याचे कारण नाही. ही लोकशाही आहे. याठिकाणी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून देशभरातील विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यासाठी तेथील स्थानिक विचार लक्षात घेऊन नावे जाहीर केली जात आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे. परंतु, मी आपणाशी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच बोलतोय. या प्रक्रियेत काही अडचणी असतात. मात्र, सातारा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असून उमेदवारीबाबत लवकरच निर्णय होईल.
महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे? याबाबत विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, कोणीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये. महायुतीने निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले आहे. लोकशाहीत कोणाला डोक्यावर घ्यायचे, हे मतदार ठरवतील. मात्र, पंधरा वर्षांतील त्यांची वाटचाल पाहिली; तर यावरूनच त्यांची प्रतिमा कळून येते, असा टोलाही त्यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा दिल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरेंनी मोदींवर विश्वास दाखवला आहे. मोदींनी चांगले काम केल्यामुळेच त्यांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. कराडमधील महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली? याबाबत विचारले असता ते म्हणाले, अशी परिस्थिती नाही. मात्र, ‘कोणाची दांडी कशी उडवयची’ हे आम्ही बघतो’, असे सांगून ते म्हणाले, मी नेहमी सकारात्मक राजकारण करतो. मी काय करणार? हे आपल्याला जाहीरनाम्यावरून दिसून येईल.
जरंडेश्वर कारखान्याच्या खाजगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सहकार चळवळीची स्थापना झाली. परंतु, काँग्रेसने खिरापत वाटल्यासारखे साखर कारखान्यांचे परवाने दिले. यातील काही कारखान्यांनी एकही गळीत हंगाम पूर्ण केल्या नाही. असे कारखाने भंगारत निघाले. मिस मॅनेजमेंट झाल्यामुळे काही सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण करण्यात आले. त्यामध्ये जरंडेश्वरच्या समावेश आहे.याबाबतची खंतही आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »