शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कृषी क्षेत्रात दर्जेदार संशोधनाची गरज:गणेश शिंदे जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कृषी क्षेत्रात दर्जेदार संशोधनाची गरज:गणेश शिंदे
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कृषी पदवीधरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संशोधनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दर्जेदार संशोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.
व्यासपीठावर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बाबासो शिंदे, श्रीरंग देसाई, वसंतराव शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मनोज पाटील, वैभव जाखले, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे आदी उपस्थित होते.
गणेश शिंदे पुढे म्हणाले, तरुणांनी शिक्षण घेत असताना फक्त परीक्षेपुरता मर्यादित विज्ञानाचा अभ्यास न करता, ते शास्त्र मानवी कल्याणासाठी कसे उपयोगात आणता येईल याचा विचार करून अंगीकार करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि आपले कार्य याच्यातून जीवन समृद्ध करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा, परीक्षांचा ताण न घेता आनंदी जीवन जगण्याची कला अवगत करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण आपण सर्व विद्यार्थी घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. कारण आज कृषी शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांची प्रगती ही संस्थेची प्रगती आहे. विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून आपले करिअर बनवावे. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाविन्याचा ध्यास घेत कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करावे व शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा प्रकारांमध्ये, विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अजित पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. श्रावणी गायकवाड हिने विद्यार्थी परिषदेचा अहवाल सादर केला. आरती शिंदे हिने क्रीडा अहवाल सादर केला. डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले. प्रा. जी. के. मोहिते व प्रा. अमोल मंडले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.