पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांच्या रांगा
कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 मधील चित्र; पहाटे चार वाजल्यापासून पालक रांगेत उभे
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
येथील कराड नगरपालिका शाळा क्र. 3 या राज्यातील सर्वांत जास्त पटसंख्या आणि गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या शाळेचा राज्यासह देशभरात मोठा नावलौकिक आहे. त्यामुळे या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकही प्रयत्नशील असतात. नुकतेच या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी कोणत्याही मंदिरासमोर देवदर्शनासाठी लागलेल्या रांगेप्रमाणे आपल्या पाल्यास पीएम श्री कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 मध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांनी पहाटे चार वाजल्यापासून रांग लावल्याचे आशादायी चित्र दिसून आले.
केंद्र शासनाच्या उदयोन्मुख भारतासाठी पंतप्रधान शाळा अर्थात ‘पीएम श्री स्कूल’साठी नुकतीच कराड नगरपालिकेच्या शाळा क्र. 3 ची निवड झाली आहे. या निवडीमुळे शाळेस भौतिक सुविधांसाठी एक कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरपालिका शाळा क्र. 3 ही सतत सात वर्षे राज्यात प्राथमिक विभागात रॅक एकवर आहे. पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल व विविध स्पर्धा परिक्षांसाठी शाळेचे 500 हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शासनाने वेळोवेळी या शाळेचे सादरीकरण राज्यातील इतर शाळांपुढे केले आहे. सध्या शाळेची पटसंख्या 2789 असून शाळेला स्वतःची बालवाडी आहे. शाळेकडे 52 स्कूल बस आहेत. आदी सुविधांमुळे या शाळेत आपल्या पाल्यांच्या प्रवेशसाठी पालकांची मोठी धडपड सुरु असते.
त्यानुसार सोमवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. यावेळी आपल्या पाल्यांचा प्रवेश अंतिम करण्यासाठी पालकांनी शाळेबाहेर पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावल्याचे दिसून आले. एखाद्या शासकीय नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पहाटेपासून पालकांनी रांगा लावल्याचे चित्र महाराष्ट्रात फक्त याच शाळेत पहावयास मिळते. पहिलीच्या गर्वासाठी 400 जागा असून प्रवेशासाठी 1157 अर्जांची विक्री झाली आहे.