मोठ्या लग्नाची यादीही मोठ्ठीच असते उदयनराजे भोसले; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन
मोठ्या लग्नाची यादीही मोठ्ठीच असते
उदयनराजे भोसले; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कोणत्याही लग्न समारंभावेळी यादी ही असतेच. ज्याप्रमाणे एखादे मोठ्ठे लग्न असते, त्यावेळी यादीही तितकीच मोठ्ठी असते. त्यामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे; हे नको, ते नको अशा गोष्टी असतात. राजकारणाचेही असेच आहे. जरी भाजपच्या उमेदवार यादीत नाव यायला उशीर होत असला,तरीही ज्या-त्या वेळी ज्या-त्या गोष्टी होतील, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
विजयनगर येथील महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी खा. उदयनराजे भोसले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देवून अभिवादन केले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या भाजपच्या उमेदवार यादी नाव यायला एवढा उशीर का होत आहे? या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. यावेळी राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळव्याला कितपत महत्त्व आहे. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, सगळेच मेळावे महत्त्वाचे असतात. मेळाव्याच्या निमित्ताने लोक, कार्यकर्ते एकत्र येतात. आपापल्या व्यथा मांडतातम, विचारांची देवाण-घेवाण होते. निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. धावपळीच्या युगात इच्छा असूनही एकत्र यायला वेळ मिळत नाही. पण मेळाव्याच्या माध्यमातून लोक एकत्र येतात. त्यानुसार या मेळाव्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघातीलपदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.