देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज : शंभूराज देसाई कराडमध्ये महायुतीचा संवाद मेळावा, निवडणुकीचे सूक्ष्म हवे
देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज : शंभूराज देसाई
कराडमध्ये महायुतीचा संवाद मेळावा, निवडणुकीचे सूक्ष्म हवे
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. उमेदवार कोणीही असो; मोदींच्या नावावर निवडणूकीला सामोरे जायचे आहे. येत्या पाच वर्षांत पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे नाव असेल, असा मोदींचा प्रयत्न आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठा उठाव झाला. त्यांनी कोणाच्याही राजकीय भवितव्याला तडा जाऊन दिला नाही. लोकसभा निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करायला हवे. एकमेकांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. बूथवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून स्वतःचे बूथ प्लसमध्ये जातील, यासाठी प्रयत्न करावेत. हा विजय आपलाच असेल.
असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
विजयनगर, ता. कराड येथे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खा.छत्रपती उदयनराजे भोसले , आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, चितलेखा माने, सुनील काटकर, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, सचिन नलवडे, जितेंद्र डुबल, सागर शिवदास, कविता कचरे, स्वाती पिसाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले. जिल्ह्यातील अनेक नवरत्नांनी दिलेल्या योगदानामुळे देशासह महाराष्ट्रात साताऱ्याची ओळख आहे. याच विचारातून आणि प्रेरणेतून आतापर्यंत फक्त लोकहिताचेच समाजकारण केले असून काल, आज आणि उद्याही सर्वांच्या सेवेसाठी आपण ठामपणे उभे असू, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, केंद्रात दोन लोकांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाची आज देशासह जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख आहे. ही नरेंद्र मोदी यांची किमया आहे. आपण त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचा प्रस्ताव मांडला होता. आज या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले असून येथील भूमी सुजलाम, सुफलाम झाली आहे. साताऱ्यासाठी महायुतीचे नेते जो कोणी उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नरेंद्र पाटील म्हणाले, गत पंचवार्षिकला पावसात भिजलेल्या काकांनी केलेल्या बॅटिंगमुळे मतदारांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे निकाल फिरला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. लोकसभेला मी अजूनही इच्छुक आहे. गत निवडणुकीत मी आणि उदयनराजे एकमेकांसमोर उभे होतो. आज एकाच व्यासपीठावर उपस्थित आहोत. परंतु, महाराज जेथे उभे; तेथे सगळे आडवे होतात. पण काही नरेंद्र अजूनही त्यांच्या पुढे उभे आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी उदयनराजेंना लगावली. मात्र, आम्ही पक्षश्रेठी जो उमेदवार देतील, त्याला पूर्णपणे साथ देऊ.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आज जगात भारताकडे सन्मानाने पाहिले जाते. काँग्रेसच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. जगातील लोकप्रतिनिधी मोदींकडे आशेने आणि आदराने पाहतात. उदयनराजेच उद्याचे उमेदवार असतील. वरिष्ठ पातळीवर लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यावी. राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी महायुतीच्या सोबत रहा. ऊसदर, साखर कारखानदारीला अमित शहांनी मोदींच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस आणले. काँग्रेसने खाजगी कारखान्यासाठी एक आणि सरकारी कारखान्यासाठी एक असा न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु, भाजपच्या काळात कारखानदारांना न्याय मिळाला.
प्रस्ताविकात डॉ. अतुल भोसले म्हणाले, भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदी सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे काम मोडी सरकारने केले आहे. येणाऱ्या काळात महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. महायुतीच्या उमेदवाराला कराड दक्षिण मतदारसंघातून मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.राजेंद्रसिंह यादव यांनी आभार मानले.